
‘पार्ले-जी’ने मोडला विक्रीचा 82 वर्षांचा विक्रम
मुंबई : लॉकडाउनमध्ये अनेक कंपन्या तोट्यात जात असताना पार्लेच्या ‘पार्ले-जी’ बिस्किटांची विक्रमी विक्री झाली. १९३८ पासून पार्लेची बिस्किटे बाजारात आली आहेत. लॉकडाऊनच्या काळात पार्ले-जी बिस्किटांनी विक्रीचे सर्व विक्रम मोडले. या काळात पार्ले-जी बिस्किटांची एवढी विक्री झाली की 82 वर्षांचा विक्रम तुटला आहे.
पाच रुपयांपासून मिळणारे पार्ले-जीचे पुढे लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी दोन वेळचे अन्न ठरले होते. गावाला पायी – वाहनांवर निघालेले मजूर पोट भरण्यासाठी मोठ्या संख्येत पार्ले – जी चे पुडे विकत घेत होते. अनेक घरांमधूनही पार्ले – जी ची मागणी वाढली होती. अनेक ठिकाणी गरजूंना खाद्य पदार्थ म्हणून समाजसेवी संस्था / माणसे, पार्ले – जी च वाटत होते. अशी सर्व बाजूने पार्ले – जी ची विक्री वाढली होती. पार्ले प्रोडक्ट्सची भारतात एकूण १३० उत्पादन केंद्र आहेत. यामधील १० जागा त्यांच्या मालकीच्या आहेत. २०२० या वर्षात भारतात ३६ ते ३७ हजार कोटी रुपयांची बिस्किटे विकली जाण्याचा अंदाज आहे.
गेल्या तीन महिन्यात पार्ले-जी शिवाय इतरही बिस्किटांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ब्रिटानियाच्या गुड डे, टायगर, मिल्क बिकी, बॉरबॉर्न आणि मारी आणि पार्लेच्या क्रॅकजॅक, मोनॅको आणि हाईड अँण्ड सिकचीही विक्री खूप वाढली. पार्ले-जी ची किती विक्री झाली याची माहिती कंपनीने दिली नाही. मात्र, गेल्या आठ दशकातील आकडेवारी पाहता मार्च, एप्रिल आणि मे हे सर्वोत्तम महिने राहिले असल्याचे मान्य केले. “एकूण मार्केट शेअरमध्ये आमची ५ ट्क्के वृद्धी झाली आहे. पण त्यातही ८० ते ९० टक्के वृद्धी ही केवळ पार्ले-जी च्या विक्रीमुळे झाली आहे. हे अनपेक्षित आहे,” असे पार्ले प्रोडक्ट्सचे मयांक शाह म्हणालेत. २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना काम सुरू कऱण्याची परवानगी देण्यात आली होती. .
“लॉकडाउनदरम्यान पार्ले-जी बिस्किटे हेच अनेकांचं अन्न होतं. हे सामान्य माणसाचे, सर्वांना परवडणारे बिस्किट आहे,” असे शाह म्हणतात. अनेक राज्यांनीही आपल्याकडे बिस्किटांची मागणी केली होती, असे त्यांनी सांगितलं. राज्य सरकारे आमच्याकडे किती स्टॉक आहे याची वारंवार माहिती घेत होते असे ते म्हणालेत.