
पाकिस्तानने दहशतवाद तत्काळ थांबवावा : ट्रम्प यांचा इशारा
अहमदाबाद (तेज़ समाचार डेस्क ): भारत भेटीवर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद थांबवण्याचा इशारा दिलाय. गुजरातमधील अहमदाबाद येथील मोटेरे स्टेडियममध्ये बोलताना ट्रम्प यांनी ही चेतावणी दिली आहे.
याप्रसंगी ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तानने त्यांच्या जमीनीवरुन होणाऱ्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात. पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नरत आहे. कट्टर इस्लामिक दहशवाद संपवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करेल. भारत पाकिस्तान सिमेवरील दहशतवादी तळ संपवण्यासाठी आम्ही पाकिस्तानबरोबर काम करत आहोत. आमचे पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारत असले तरी त्यांनी दहशतवादी कारवायांसाठी आपली जमीन वापरु देऊ नये. पाकिस्तानमधील दहशतवादी गटांची नावे घेत ट्रम्प यांनी पाकिस्तानवर थेट निशाणा साधला. पाकिस्तानसोबत मिळून सीमेपलीकडील दहशतवाद संपवण्याचा प्रयत्न सुरु ठेऊ असेही ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. भारताची बाजू घेताना ट्रम्प म्हणाले की, भारतीयांना त्यांच्या सीमांचे संरक्षण करण्याचा हक्क आहे.
भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधनांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध दिवसोंदिवस दृढ होताहेत. प्रत्येक अमेरिकन नागरिक भारतीयांना पसंत आणि प्रेम करतोय. भारत आणि अमेरिकेची मैत्री आजपर्यंतची सर्वात दृढ मैत्री आहे. यापूर्वी दोन्ही देशांत इतकी दृढ मैत्री नव्हती असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी ट्रम्प यांनी आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्याचा निर्धार व्यक्त केला. भविष्यात भारत आणि अमेरिका मिळून इस्लामिक दहशतवादाविरोधात संयुक्त लढा देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.