दुर्धर आजारांशी झुंजत केली कोरोनावर मातसाडी, आंबे देऊन अधिष्ठात्यांनी केली महिलेची आखाजी गोड

Featured जळगाव महाराष्ट्र
Share This:

दुर्धर आजारांशी झुंजत केली कोरोनावर मात

साडी, आंबे देऊन अधिष्ठात्यांनी केली महिलेची आखाजी गोड

@ हिमोग्लोबिन केवळ दीड ; त्यातही ४ दुर्धर आजार !

@ २५ वर्षीय कोरोनाबाधित गर्भवती महिलेवर “शावैम” मध्ये यशस्वी उपचार

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागात केवळ दीड हिमोग्लोबिन असलेल्या तसेच चार आजारांनी ग्रस्त असलेल्या २५ वर्षीय कोरोनाबाधित गर्भवती महिलेला मृत्यूच्या दाढेतून वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. तिच्या पोटातील अडीच महिन्यांचा मृत गर्भदेखील काढण्यात आला आहे. शुक्रवारी १४ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत महिलेला साडी, गुळ-शेंगदाने चिक्की, आंबे भेट देऊन अनोखा व अविस्मरणीय निरोप देण्यात आला.

बोदवड येथील एका पानटपरी चालकाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यात त्यांच्या २५ वर्षीय पत्नीला हाडांचा ठिसूळपणा, रोगप्रतिकारकशक्तीशी संबंधित एसएलई, रक्तक्षय, थॅलेसेमिया अशी आजार जडलेली आहेत. या आजारांवर मुंबईत देखील उपचार सुरु आहे. सध्या कोरोनाच्या काळात मुंबईला जाणे शक्य न झाल्याने या महिलेला उपचार घेणे थांबलेले होते. ती अडीच महिन्यांची गर्भवती देखील होती. अशातच तिचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बोदवड ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात होते. ३ मे रोजी महिलेचे हिमोग्लोबिन कमी होऊन प्रकृती गंभीर झाली, त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या टीमने उपचार सुरु केले. तपासणी केल्यावर तिचे हिमोग्लोबिन दीड एचबी निघाले. तिला उभे राहता येणे अशक्य झाले होते. ऑक्सिजन स्थिती ८० होती. श्वासोच्छ्वासाचा वेग जास्त असल्याने धाप लागत होती. गंभीर अवस्थेत ती दाखल झाली. वाचण्याची शक्यता कमी होती.

जाहिरात

डॉक्टरांनी उपचार सुरू केले. महिलेला रक्ताच्या सहा पिशव्या लावाव्या लागल्या. अतिदक्षता विभागात दाखल करून तिची स्थिती नियंत्रणात आणली. तसेच,पोटातील गर्भाचीदेखील तपासणी केल्यानंतर तो अडीच महिन्याचा मृत असल्याचे दिसले. त्यामुळे हा गर्भ सुरक्षित पद्धतीने काढून टाकण्यात आला. आता या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिला पुढील २ दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवल्यानंतर शुक्रवारी १४ रोजी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वतीने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते सदर महिलेला साडी, गुळाची चिक्की आणि आखाजीनिमित्त आंबे भेट देत तिला सन्मानाने व अविस्मरणीय असा निरोप देण्यात आला. प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. संदीप पटेल, विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे उपस्थित होते.

महिलेवर यशस्वी उपचार करणेकामी डॉ.संजय बनसोडे यांच्यासह डॉ. रोहन केळकर, डॉ. शीतल ताटे, डॉ. सुधीर पवनकर, डॉ. राजश्री येसगे, डॉ. प्रियांका शेटे, अधिपरिचारिका विमल चौधरी, राजश्री अढाळे यांनी परिश्रम घेतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे रुग्णांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांवर यशस्वी उपचार होत असल्याने रुग्णांचा दाखल होण्याचा कल वाढत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *