
भाजप सत्तेत न आल्यानेच कांदा निर्यात बंदी- निरीक्षक अनिल गोटे
भाजप सत्तेत न आल्यानेच कांदा निर्यात बंदी- निरीक्षक अनिल गोटे
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : राज्यात १०५ आमदार निवडूनही भाजप सत्तेत न असल्याने कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी लादल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक माजी आमदार अनिल गोटे यांनी केली. काल शनिवारी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाकडून निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी बाजार समितीत घुसून जोरदार घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून निषेध करण्यात आला आहे. आज शनिवारी सलग दुसऱ्याही पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व पक्ष निरीक्षक माजी आमदार अनिल गोटे यांनी केले. माजी आमदार अनिल गोटे यांचे आगमन झाल्यानंतर युवा नेते डॉ.अभिजित मोरे व पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे बंद करण्यात आलेले गेट उघडून कार्यकर्त्यांनी आत प्रवेश करीत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी पक्ष निरीक्षक माजी आमदार अनिल गोटे यांनी केंद्र सरकारवर टीका करीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जून महिन्यात केंद्र सरकारने निर्यात बंदी मधून उत्पादने वगळली होती. त्यात कांद्याच्या समावेश करण्यात आला होता. त्याच वेळी केंद्राने कांदा निर्यात बंदी लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. निर्यातबंदी नसल्याने जगाच्या पाठीवर शेतकरी कोठेही ही कांदा नेऊन विकू शकतो. कांदा निर्यात लागू होणार नसल्याने भारतीय जनता पार्टीने सरकारचे तोंडभरून कौतुकही केले.
दोनच महिन्यात सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लादून शेतकऱ्यांवर अन्याय केला. राज्यात भाजपचे १०५ आमदार निवडून देखील सत्ता मिळू न शकल्याने केंद्राने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याची टीका गोटे यांनी केली.
आंदोलनात डॉ. अभिजित मोरे, पुष्पा गावित, सुरेखा वाघ, दिनेश पाटील, ॲड.अश्विनी जोशी,बि.के पाडवी, जितेंद्र खांडवे,जितेंद्र मराठे, धनराज बच्छाव, गुलाब नाईक,रविंद पाटील, गोकुळ पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला