
वर्क फ्रॉम होम चा असाही एक परिणाम
वर्क फ्रॉम होम चा असाही एक परिणाम
पुणे (तेज समाचार डेस्क): करोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीत सध्या बहुतांश प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली, तरी अनेक वाहने अद्यापही बंद असल्याने नेहमीच्या प्रमाणात डिझेलची विक्री निम्मीच होत असून, पेट्रोलचा खपही ७५ टक्क्यांपर्यंतच आहे. त्यातच आठवडय़ापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू झाली असून, १६ ऑगस्टनंतर एक रुपयांहून अधिकची दरवाढ झाली आहे. सुमारे ३ लाख आयटी कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण निम्मे झाले, त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. प्रदुषण पातळीसुध्दा खूप सुधारणा आहे.
टाळेबंदीतील शिथिलतेमध्ये सध्या शहरांतर्गत आणि जिल्हांतर्गत वाहतुकीचे निर्बंध उठविण्यात आले आहेत. अनेक उद्योग आणि नियमानुसार कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वच कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, इंधनाची विक्री अद्यापही पूर्वीप्रमाणे होऊ शकलेली नाही. डिझेलचा सर्वाधिक वापर करणारी प्रामुख्याने प्रवासी वाहतुकीतील आणि काही प्रमाणात माल वाहतुकीतील काही वाहने अद्यापही बंद आहेत. त्याचा परिणाम म्हणून डिझेलची विक्री केवळ पन्नास टक्क्यांवर आहे. अनेक जण अद्यापही घरून काम करीत आहेत. त्याचप्रमाणे कमी कामगारांत कार्यालये सुरू असल्याने मोटारी किंवा दुचाकीसाठीही पेट्रोलची विक्री अद्याप कमीच आहे.
पुणे शहर आणि परिसरामध्ये दररोज ४० लाख लिटरच्या आसपास दैनंदिन डिझेलची विक्री होत होती. ती सध्या २० ते २५ लाख लिटरच्या आसपास आहे. पेट्रोलच्या दैनंदिन विक्रीचे प्रमाण सुमारे ३० लाख लिटर होते. सध्या दररोज २२ ते २५ लाख लिटर पेट्रोलची विक्री होत असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले.