ऑक्सफर्ड लस चाचणीत एकाचा मृत्यू

Featured विदेश
Share This:

ऑक्सफर्ड लस चाचणीत एकाचा मृत्यू

 

ब्राझील (तेज समाचार डेस्क): मध्ये मानवी लस चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचणी दरम्यान या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, असे ब्राझीलची आरोग्य यंत्रणा अनविसाने बुधवारी सांगितले. स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असला तरी, लस चाचणी थांबणार नसल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे. ऑक्सफर्डने चाचणी सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे. क्लिनिकल ट्रायल म्हणजे मानवी चाचणीच्या सुरक्षिततेबद्दल कुठलाही शंका नाहीय, असे ऑक्सफर्डचे म्हणणे आहे. मागच्या महिन्यात ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला लशीचे डोस दिल्यानंतर दुष्परिणाम दिसले होते. त्यानंतर जगभरात ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या स्थगित करण्यात आल्या होत्या. लशीच्या सुरक्षिततेचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा चाचण्या सुरु झाल्या. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

करोना लशीच्या डोसमुळे स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असता, तर मानवी चाचणी लगेच स्थगित केली असती असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले. ज्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाला, तो कंट्रोल ग्रुपचा भाग होता. त्याला मेनिनजायटिसची लस देण्यात आली होती. स्वयंसेवकाला ट्रायल व्हॅक्सीन न देता प्लेसीबो देण्यात आले होते, असे ओ ग्लोबो या ब्राझीलियन वर्तमानपत्राने म्हटले आहे. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या वैद्यकीय माहितीबद्दल गुप्तता बाळगण्याच्या धोरणानुसार, अनविसाने सविस्तर माहिती दिलेली नाही. अस्त्राझेनेकाने यावर लगेच प्रतिक्रिया दिलेली नाही.

ब्राझीलमध्ये फेज तीनच्या मानवी चाचणीसाठी मदत करणाऱ्या साओ पावलोमधील फेडरल विद्यापीठाने स्वयंसेवक ब्राझीलियन होता, पण तो कुठे राहत होता याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. या बातमीनंतर अस्त्राझेनेकाचा शेअर १.७ टक्क्यांनी कोसळला. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीची जगभरात चाचणी सुरु आहे. भारतातही या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. अमेरिकेनंतर ब्राझीलला करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. तिथे एक लाख ५४ हजार नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *