निसर्ग’ चक्रीवादळ : कोकणवासियांना संघ स्वयंसेवकांची विविध स्वरूपात मदत
जवळपास १५० स्वयंसेवकांनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु केले
अलिबाग – ‘निसर्ग’ या चक्रीवादळाने ४ जून रोजी कोकणातील अनेक गावांना तडाखा दिला. रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांचे अतोनात नुकसान झाले असून या संकटातून ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कंबर कसली आहे. या वादळामुळे रायगड जिल्ह्यातील आक्षी, नागाव, रेवदंडा, चौल, म्हसळा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, हर्णे, मुरुड आदी गावांना तर रत्नागिरीतील दापोली, आंजर्ले, मुर्डी, केळशी आदी गावे सर्वाधिक बाधित झाली आहेत. शेती, बागायती, राहती घरे, विहिरींचे नुकसान झाले आहे. गावांचे उत्पन्नाचे साधन असणाऱ्या ८० टक्के नारळ-पोफळीच्या, आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यात संघाचे सुमारे ५० स्वयंसेवक बाधितांच्या मदतीला सरसावले आहेत. पहिले तीन दिवस रस्ते साफ करण्याचे काम करण्यात आले. ते पूर्ण झाले असून सध्या घरे, विहिरी, बागायती यांची स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.
दापोलीजवळील बाधित परिसरात संघाच्या माध्यमातून काही टीम तयार करण्यात आल्या आहेत. सुमारे १००-१२५ स्वयंसेवक या टीमच्या माध्यमातून मदतकार्यात सहभागी झाले आहेत. रस्ते साफ करणे, घरे साफ करणे, घरांपर्यंत रस्ता तयार करणे, विहिरी साफ करणे, पाण्याचे टँकर आणणे, प्रशासनाला संपर्क करणे अशी वेगवेगळी कामे हे समूह करीत आहेत. पावसामुळे ज्यांच्या घरातील सामान भिजले आहे अशा ५०० कुटुंबांसाठी शिध्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे माणसांचे केवळ आर्थिक वा घराचे-शेतीचे नुकसान झाले नाही. तर अनेक माणसे मानसिकदृष्ट्याही खचली आहेत. हे नुकसान भरून काढण्यास आणखी किती वर्षे जातील याचा अंदाज त्यांना बांधता येत नसल्याने संसाराची चिंता त्यांना सतावत आहे. अशा काळात मानसिक आधार देण्यासाठी राष्ट्र सेविका समितीच्या भगिनी पुढे आल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्तेही या मदतकार्यात सहभागी झाले आहेत. मुंबईतून काही स्वयंसेवकांनीही कोकणातील बांधवांना मदत देण्यास सुरुवात केली आहे.