नाशिक : कोरोना संकटात मास्कची निर्मिती महिला बचत गटांना मिळाले 42.55 लाखांचे उत्पन्न

Featured नाशिक
Share This:

नाशिक : कोरोना संकटात मास्कची निर्मिती महिला बचत गटांना मिळाले 42.55 लाखांचे उत्पन्न

 

नाशिक (तेज समाचार डेस्क):  दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने मोठा पेच निर्माण केला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत या बचतगटांतील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून मास्क निर्मितीचा मंत्र दिला आणि पाहता पाहता या लघुउद्योगाने संपूर्ण जिल्ह्याला एकप्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी ‘सुरक्षाकवच’च तयार करून दिले. आज जिल्ह्यातील २५३ बचत गटांनी तयार केलेले तब्बल ४ लाख ३६ हजार मास्क निर्मिती केली असून, त्यापैकी ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री केली आहे. त्यातून तब्बल ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २५ मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनमुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेकांचे रोजगार गेले. उन्हाळ्यात वाळवणं तयार करुन लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटाच्या हाताचेही काम गेले. गटातील महिलांचाही उपजिविकेचा प्रश्न उभ राहिला. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या बचत गटांना ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर मास्क तयार करून त्याची विक्री करावी, असे आवाहन करून बचतगटाच्या काम करणाऱ्या महिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली. जिल्ह्यातील २५३ बचतगटांनी लीना बनसोडे मॅडमच्या आवाहनाला प्रतिसाद देवून आजपर्यंत ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री करून ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.
मास्क निर्मितीतून बचतगटांनी मोठे काम उभे केले

बचत गटांच्या चळवळीवर आणि त्यांच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेल्या १२ वर्षांपासून मी या बचत गटांचे काम खूप जवळून पाहिले आहे. त्यात सहभाग घेतला आहे. करोना संकटसमयी मला खात्री होती की, बचत गटांच्या माध्यमातून आपण खूप मोठे काम उभे करू शकतो. आमच्या आवाहनाला महिलांनीही प्रतिसाद दिला. त्यांच्या हातांनाही काम मिळाले, रोजगार मिळाला. खास करून त्यांचा आत्मविश्वासही वाढला.

– लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सामाजिक बांधिलकीतून उपजिविका :

कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क गरजेचा आहे. आज घराबाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र मास्क वापराची जनजागृती करीत असताना जाणविले की ग्रामस्तरावर मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे तालुकास्तरावरुन बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देवून त्यांची उपजीविका साधण्याचा सुवर्णमध्य जिल्हा परिषदेने साधला.

प्रबोधन करणाऱ्या वर्गाला मास्कची आवश्यकता :

कोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यात साडे तीन हजार आशा, ७३९ आरोग्य सेविका, ३२८ आरोग्य सेविका व ९१०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्वांना मास्क अत्यंत गरजेचे असल्याने स्वयंसहायता समुह बचत गटांकडून मास्क तयार करण्यात आले व बचतगटांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.

तालुकानिहाय मास्कची विक्री व उत्पन्न :

जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये निफाड तालुका अग्रेसर असून, या तालुक्यातील केवळ ११ बचतगटांनी ९३८९० मास्कची विक्री करून ३ लाख ४४ हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. या तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी बचतगटांना कापड व दोरा उपलब्ध करून त्यांना आवश्यक तो मोबदला दिला. तसेच नाशिक तालुक्यातील बचत गट उत्पन्न मिळविण्यात अग्रेसर असून, २४ बचतगटांनी ५७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ६ लाख ७९ हजार एवढे उत्पन्न मिळविले आहे. चांदवड तालुक्यात ८०३५० मास्कची विक्री झाली असून, त्याद्वारे ३ लाख ७८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. बागलाण तालुक्यात २७ हजार मास्कची विक्री झाली करून त्यातून तीन लाख ५० हजाराचे उत्पन्न मिळविले. देवळा तालुक्याने ७ हजार मास्कची विक्री करून त्यातून ४४५५७ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. दिंडोरी तालुक्याने ३२१०० मास्कची निर्मिती करून ५ लाख ९३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. इगतपुरी तालुक्याने १८७७५ मास्कची विक्री करून त्यातून २ लाख ७३ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.

कळवण तालुक्यातील बचतगटाने ९७५० मास्कची विक्री करून १ लाख ४८ हजाराचे उत्पन्न मिळविले आहे. मालेगाव तालुक्यात २२१८३ मास्कची विक्री करून त्यातून ३ लाख १८ हजाराचे उत्तन्न मिळविले आहे. नांदगाव तालुक्याने २८४६५ मास्कची विक्री केली असून त्यातून ४ लाख ७० हजार ९०० इतके उत्पन्न मिळविले आहे. पेठ तालुक्याने ७८७० मास्कची विक्री करून १ लाख ३२ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सिन्नर तालुक्याने १७ हजार मास्कची विक्री करून २ लाख १६ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. सुरगाणा तालुक्याने ८५५५ मास्कची विक्री करून १ लाख २१ हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. येवला तालुक्यातील बचतगटांनी १७८६० मास्कची विक्री करून १ लाख ४१ हजार हजार इतके उत्पन्न मिळविले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याने ६४०० मास्कची विक्री करून ९०५०० रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *