
नाशिक: वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
नाशिक (तेज समाचार डेस्क): कोरोना रूग्णसंख्या संपुर्ण महाराष्ट्रात वाढत असताना अनेक जिल्ह्यात प्रशासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. कडक निर्बंध लागू करूनही कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने 3 मार्च ते 15 मार्चपर्यंत संपुर्ण जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात सध्या कोरोना पुन्हा डोकं वर काढतो आहे. अशातच अनेक जिल्ह्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा व शहरात नागरिक निर्धास्तपणे विना-मास्क बाहेर फिरताना आढळुन येत आहेत. तसेच प्रशासनाने ठरवुन दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवुन नागरिक मनमानी करत असल्याचं लक्षात आल्यानंतर आता विना-मास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाने विना-मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडुन 1000 रूपये दंड स्वरुपात वसुल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान केल्याची खात्री करा असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे.
जिल्ह्यात वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन रात्रीची संचारबंदी लागु करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त अन्य कोणी अनावश्यक फिरताना आढळुन आल्यास त्याच्यावर कायदेशिर कारवाई होणार आहे. संपुर्ण नाशिक जिल्ह्यात हा निर्णय लागु असेल. तसेच 15 मार्चनंतर शाळा उघडायच्या की नाही, याबाबत 14 मार्चला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.