
नाशिक शहरात १ मालेगावात आढळले ४ नवीन रुग्ण
मालेगाव (तेज समाचार डेस्क) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने मालेगाव शहर करोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे.
आज नाशिक शहरात एका २४ वर्षीय तरूण पुरूषाला कोरोना ची लागण झाल्याचे आढळून आले आहे तर मालेगाव मध्ये आत्ताच प्राप्त झालेल्या नमुन्यांमध्ये ४ नवीन करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ४६ करोना संसर्गित असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे. नाशिक शहरातील रूग्ण हा डॉ. जाकीर हुसेन रूग्णालयात उपचार घेत असून तो नाशिक येथील समाज कल्याण वसतीगृह परिसरातील रहिवासी आहे. तसेच मालेगावमधील वाढलेले ४ रूग्ण हे २५ वर्षीय पुरुष (मोमीनपूरा), २६ वर्षीय महिला (मोमीनपूरा), ५० वर्षीय महिला (नयापूरा), ४० वर्षीय पुरुष (मालेगांव) येथील असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालय, नाशिक यांनी कळविले आहे.
शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काल पर्यंत मालेगाव शहरात ३५ रुग्ण होते यात आज १५ एप्रिल रोजी ४ रुग्णांची भर पडली असून मालेगाव शहरातील रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. तर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात १ तर धुळे येथील शासकीय रुग्णालयात १ असे दोन करोना बाधित रुग्ण मृत पावले आहेत. नाशिक शहरातील रूग्ण संख्या आता ७ झाली असून मालेगाव मध्ये ३९ करोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत, जिल्ह्यात एकूण ४६ करोना पॉझिटिव्ह असून त्यात धुळे येथे मृत झालेल्या महिलेचा समावेश नाशिक जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्येत न करण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत, असे जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी कळविले आहे.