नंदुरबार: जिल्ह्यात शासनातर्फे मोफत तांदळाचे वितरण सुरू

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार (तेज समाचार डेस्क) :  प्रधान मंत्री गरीब कल्याण येाजनेअंतर्गत दोन दिवसात जिल्ह्यातील 38 हजार शिधापत्रिकाधारकांना 9161 क्विंटल मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तर सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत आतापर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील 2 लाख 28 हजार 141 कार्डधारकांना 56 हजार 193 क्विंटल धान्य वाटप करण्यात आले आहे.

शिधापत्रिकेवर नमूद दोन्ही येाजनेतील सुमारे 11 लाख 25 हजार नागरिकांना 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना वेळेवर धान्य वितरण करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याला नियमित वितरणासाठी एकूण गव्हाचे 26 हजार 840 क्विंटल आणि तांदुळाचे 37 हजार 820 क्विंटल नियतन प्राप्त झाले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 57 हजार 10 क्विटल तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. ई-पॉस मशिनने धान्य वितरीत करताना दुकानदाराला स्वत:चे बायोमेट्रीक उपयोगात आणून वितरण करण्याची अनुमती देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यास 15 किलो गहू 2 रुपये प्रति किलो दराने व 20 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने दिला जातो. तर 20 रुपये दराने एक किलो साखर देण्यात येते.

प्रधान्य कुटुंबातील लाभार्थ्यास 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ देण्यात येतो. अक्कलकुवा तालुक्यातील 34 हजार 294 शिधापत्रिका धारकांना ( 8446 क्विंटल), अक्राणी 20 हजार 281 (5150 क्विंटल), नंदुरबार 56 हजार (13640 क्विंटल), नवापूर 42 हजार 554 (10340 क्विंटल), शहादा 49 हजार 950 (12267 क्विंटल) आणि तळोदा तालुक्यातील 25 हजार 62 कार्डधारकांना 6350 क्विंटल धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 88 टक्के कार्डधारकांना नियमित धान्याचे वितरण करण्यात आले आहे. नियमित धान्य घेतल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाच किलो याप्रमाणे सदस्यसंख्येनुसार तांदूळ मोफत वितरीत करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी तांदूळाचे वितरण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत अक्कलकुवा तालुक्यातील 52 शिधापत्रिका धारकांना 1181 किलो, अक्राणी 562 शिधापत्रिका धारकांना 17.8 क्विंटल, नंदुरबार 13567 शिधापत्रिका धारकांना 318 क्विंटल, नवापूर 5649 शिधापत्रिका धारकांना 125 क्विंटल, शहादा 11011 शिधापत्रिका धारकांना 283 क्विंटल आणि तळोदा तालुक्यातील 7160 शिधापत्रिका धारकांना 169 क्विंटल तांदुळाचे वितरण करण्यात आले आहे.

अंत्योदय योजनेतील 13 हजार 747 शिधापत्रिका धारकांना 341 क्विंटल तर प्राधान्य कुटुंब योजनेतील 24557 शिधापत्रिका धारकांना 574 क्विंटल तांदुळाचे वाटप करण्यात आले आहे.
धान्य वितरण नियमानुसार होण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष वितरणस्थळी भेटी देत आहेत. याशिवाय जि.प. शिक्षण विभागाचे मुख्याध्यापक, केंद्र अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची पर्यवेक्षणाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. धान्य वितरणाचे वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. गरजूना नियमानुसार धान्य मिळावे याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जात असून आतापर्यंत नियमानुसार वितरण न करणाऱ्या 2 दुकानदारांचे परवाने आतापर्यंत रद्द करण्यात आले आहे. संकटाच्या परिस्थितीत गरजू व्यक्तींना धान्य मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांना धान्य वितरणाबाबत तक्रार असल्यास त्यांनी 02564-210009 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *