नंदुरबार जिल्‍हा अनलॉक; सर्व व्यवहार होणार सुरळीत

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार  (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांचा (Corona positive patient) पॉझिटिव्हिटी रेट ३.३१ टक्के असून ऑक्सिजन बेडस् व्यापलेली टक्केवारी २९.४३ टक्के इतकी आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार दुसऱ्या स्तरात समाविष्ट होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Nandurbar collector rajendra bharud) यांनी काही निर्बंध शिथिल केले आहेत. अत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापना सोमवारपासून (ता. ७) आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेत सुरू राहणार आहेत. या निर्णयाचे व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात आले आहे. (coronavirus-collector-rajendra-bharud-new-order-nandurbar-district-unlock)

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेल्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित व त्याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने आस्थापना सर्व दिवशी नियमित वेळेत पूर्ण सुरू राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह, रेस्टॉरंट आसनाच्या ५० टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी, खुली मैदाने सर्व दिवशी नियमित वेळेत सुरू राहण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व खासगी आस्थापना देखील नियमित वेळेत सुरू ठेवण्यासाठी सूट देण्यात आली आहे.

मैदानी खेळांना सूट

शासकीय व निमशासकीय कार्यालय १०० टक्के कर्मचारी उपस्थितीसह सुरू राहणार आहेत. मैदानी खेळांना पूर्णवेळ सूट देण्यात आली आहे. तर इनडोअर खेळांना सर्व दिवशी सकाळी ५ ते सकाळी ९ व सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय लग्न समारंभ हॉलमधील आसनाच्या ५० टक्के क्षमतेसह परंतु १०० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत करणे बंधनकारक असणार आहे. बैठका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा ५० टक्के क्षमतेसह होणार आहेत. यासोबतच बांधकाम, कृषी व कृषीपूरक सेवा, ई-कॉमर्स- वस्तू व सेवा नियमित वेळेत सुरू राहणार आहेत. पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू राहणार आहे.

सलून, व्यायामशाळा ५० टक्‍के

व्यायामशाळा, केश कर्तनालय, ब्यूटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेसह सुरू असले तरी या ठिकाणी लसीकरण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १०० टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहे. माल वाहतूक, आंतरजिल्हा वाहतूक, खासगी वाहने, टॅक्सी, बसेस नियमित सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. आंतरराज्य सीमा, खासगी कोचिंग क्लासेस, मोठ्या प्रमाणावर होणारे संमेलनांना यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या आदेश लागू राहणार आहेत. दरम्यान, कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी दिला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *