
नंदुरबार: कोविड कॉरंटटाईन सेंटरमध्ये दाखल नागरिकांचा संताप; असुविधेने ग्रासले
कोविड कॉरंटटाईन सेंटरमध्ये दाखल नागरिकांचा संताप; असुविधेने ग्रासले
कोंडवाड्या सारखे ठेवले जाते, एकाच ठिकाणी पाण्याची सुविधा असल्याने संसर्गाचा धोका
पीपीई किट,ग्लोज कक्ष परिसरातच जातात फेकले, वैद्यकीय सुविधेची मागणी
नंदुरबार (तेज समाचार प्रतिनिधी): शहराबाहेरील होळ शिवारातील कोविड कक्षामध्ये असुविधेचे साम्राज्य पसरलेले आहे. कक्षात स्वच्छता होत नसल्याने व वैद्यकीय पथकाने वापरलेले पीपीई किट आणि ग्लोज परिसरातच फेकले जात असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. कॉरंटाईन सेंटरमध्ये कोंडवाड्या सारखे ठेवले गेलेले आहे. पाणी घेण्यासाठी एकाच ठिकाणी सुविधा असल्यामुळे सर्व जण त्याठिकाणी येत असल्याने परिणाम गंभीर होऊ शकतात अशी भीती उपचारासाठी दाखल झालेल्या नागरिकांनी व्यक्त करत आरोग्य प्रशासनाचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात आता कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक वरून २०० च्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात सर्वत्र प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुरू असताना शहराबाहेरील होळ शिवारातील विमल हौउसिंग सोसायटी परिसरात असलेल्या सेंटरमध्ये असुविधेच्या साम्राज्यामुळे दाखल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कक्षातील रूम मध्ये पाणी नसल्यामुळे व विजेची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
होळ शिवारातील कोविड कक्षातील वैद्यकीय पथक दाखल नागरिकांवर औषध उपचार करीत असतांना संरक्षण म्हणून पीपीई किट, हातात ग्लोजच्या वापर करीत असतात. काम झाल्यानंतर कक्षातील कर्मचारी कक्षाच्या बाहेर किट व ग्लोज फेकून देत असतात त्याच प्रमाणे खरकट अण्णा ही त्याच ठिकाणी टाकत असल्याने तेथे गाय,बैल,कुत्रा असे पाळीव प्राण्यांचा वावर असतो. प्राण्यांच्या पोटात वापरलेले पीपीई कीट किंव्हा ग्लोज पोटात गेल्यास वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरंटाईन सेंटरच्या समोरच्या परीसर हा रहिवासी भाग आहे. त्या ठिकाणी रस्त्याने नेहमी नागरिकांची ये-जा सुरू असते अशा परिस्थितीत एखाद्या पाळीव प्राण्याने पीपीई किट किंवा ग्लोज परिसरात नेल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना महामारीचा स्फोट होऊ शकतो.
गेल्या आठवड्यात धुळे येथील प्रयोग शाळेतील कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून स्वब नमुन्यांची चाचणी घेतली जात नव्हती त्यामुळे अहवालही येत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करीत कॉरंटाईन कक्षाच्या बाहेर सोशल डिस्टन्सच्या उपयोग करून ३० ते ३५ जण एकत्र जमा होत ‘आत्ताच’ अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी केली होती. काही कालावधीनंतर संबंधितांना समजावून मन वळवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात आला होता.
निरोगी रोगग्रस्त बनण्याची भीती
शहरातील कंजरवाडा परिसरातील २४ वर्षीय युवकास कक्षात दाखल करण्यात आले आहे.कक्षात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वेळेवर अस्वच्छता होत नाही. सुविधांचा अभाव आणि महत्त्वाचे म्हणजे आरोग्याबाबत देखभाल करण्यासाठी वैद्यकीय सुविधा तसेच डॉक्टर, नर्स उपलब्ध नाहीत ही अतिशय गंभीर बाब असून, माझ्या निरोगी मुलगा रोगग्रस्त बनत आहे
पालक
कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवी; पाणीप्रश्न गहण
कोविड सेंटरमधील दाखल एका युवकाने सांगितले की,२२ जूनला दाखल झालो. अजून, पर्यंत स्वब घेतलेला नाहीये.कारण विचारायला गेलो असता कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असतात. रुग्णवाहिका उपलब्ध नाही,स्टाफ उपलब्ध नाही असे विविध कारणे देऊन वेळ मारून नेत असतात. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. कक्षाचा संडास, बाथरूममध्ये पाणी नसल्याने बाहेर जाऊन पाणी आणावे लागत असते. ज्या ठिकाणी पाणी घेण्यास जावे लागते त्या ठिकाणी इतर कक्षातील रूममधील लोक सुद्धा एकत्र पाणी घेण्यासाठी येत असतात. मागील काही दिवसांपूर्वी पाणी घेण्यासाठी आलेल्या इतर रूमच्या सात लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ही गंभीर बाब आहे. ज्याला आजार नाही अशांनाही आजार होण्याची शक्यता आहे.