भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी

Featured मुंबई
Share This:

 

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने नुकतंच शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वविटरवर ट्विट केलं होतं. त्याच्या या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्याला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजूनही भारतीयांच्या मनातील सचिनबद्दलचा रोष कमी झालेला दिसून येत नाही. इंग्लंडचा फिरकीपटू मॉन्टी पानेसरनं नुकत्याच केलेल्या एका मागणीवरही सचिनच्या विरोधकांनी त्याला जोरदार ट्रोल केलं.

भारत इंग्लंड टेस्ट सिरीजला ‘तेंडुलकर-कुक ट्रा़ॅफी’ असं नाव देण्याची मागणी मॉन्टी पानेसरने केली आहे. आपापल्या देशांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये तेंडुलकर आणि कुक यांच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे, मात्र दोन्ही खेळाडूंच्या नावावर कोणतीही सीरिज नाही, त्यामुळे आगामी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला ‘तेंडुलकर-कुक ट्रा़ॅफी’ असं नाव देण्यात यावं, अशी मागणी त्यानं केली आहे.

सचिनवर नाराज असलेल्या क्रिकेटप्रेमींनी या ट्विटवर मॉन्टीला खडे बोल सुनावले आहेत. “भारतीयांसाठी तो आता क्रिकेटचा देव नाही”, “बोथम-कपिल का नाही?” अशा शब्दात काही जणांनी नाराजी प्रकट केली आहे, तर एकाने ‘भज्जी-पानेसर ट्रा़ॅफी’ नाव ठेवा, असा सल्ला दिला आहे. तर यूझर्सनी विचारलेल्या काही गंभीर प्रश्नांना माॅन्टीने प्रामाणिकपणे उत्तरं दिली आहेत.

सध्या सुरु असलेल्या भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत पाहुण्या संघाने पहिल्या सामन्यात तरी भारताला पराभवाचं पाणी पाजलं आहे. थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 227 धावांनी त्यांनी भारताला पराभूत केलं आहे. आता पुढील कसोटी सामना 13 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे समस्त क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *