मुंबई: दीड दिवसांचाच सार्वजनिक गणेशोत्सव

Featured महाराष्ट्र
Share This:

मुंबई  (तेज समाचार डेस्क) : पुणे, मुंबई शहरातील बहुतांशी गणेश मंडळांनी देखावा, मिरवणूक रद्द करून अत्यंत साधेपणाने उत्सव करण्याचे ठरवले आहे. आता राज्यातील अन्य जिल्ह्यांतून, तालुका आणि गाव पातळीवरही त्याच पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्णय होत आहेत. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील प्रतिबंधित क्षेत्रांतील सुमारे २० ते २५ टक्के सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी दीड दिवसाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडपात होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे.

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये करोनाबाधितांचा आकडा दररोज वाढतोच आहे. राज्य सरकारने मुंबई परिसरातील गणेशोत्सव मंडळांसाठी यापूर्वीच काही सूचना जाहीर केल्या आहेत. गणेशमूर्तीची उंची चार फुटांपर्यंत मर्यादित असावी. तसेच ऑनलाइन दर्शनाची सोय करावी, गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, अशा विविध सूचनांचा यामध्ये सामावेश आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्य़ातील मंडळांनीही सरकारच्या या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात सुमारे २ हजार ५०० नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यात १ हजार ५०० मंडळे ठाणे महापालिका क्षेत्रात येतात. यातील ७० ते ८० टक्के गणेश मंडळे ११ दिवस गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यंदा करोनाचा संसर्ग ठाणे जिल्ह्य़ात वाढत असल्याने भाविकांची गर्दी होऊन संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात २० ते २५ टक्के गणेशोत्सव मंडळांनी उत्सव दीड दिवसांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. जी गणेशोत्सव मंडळे १० दिवस गणपती साजरा करणार आहेत, ती मंडळे परिसरातील भाविकांसाठी फेसबुक किंवा विविध समाजमाध्यमांद्वारे गणपतीची ऑनलाइन आरती आणि दर्शन उपलब्ध करणार आहेत. यामुळे गर्दी टाळता येईल, असा दावा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *