
मोहन रावले शिवसेनेतला धगधगता निखारा होता : संजय राऊत
मुंबई (तेज समाचार डेस्क): परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले (Mohan Rawale) यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रावले यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली.
मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘ परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…, असे प्रसार माध्यमांशी बोलत त् राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज सकाळी मला समजलं की त्यांचं निधन झालं, ज्यानी मोहन रावले यांना जवळून पाहिलं आहे, ते म्हणजे शिवसेनेतला धगधगता निखारा होता, तो परळ ब्रँडचा शिवसैनिक होता, मोहन पाच वेळा खासदार झाला, पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला, तो तळागळातला शिवसैनिक होता.
त्याने सातत्याने पक्षाची सेवा केली, तो सामान्य माणसाचा चेहरा होता, तो अख्ख्या महाराष्ट्रात ओळखला जायचा, शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्याची सूत्रे मोहनकडे होती, तेव्हा विद्यापिठाच्या निवडणुका हा मोठा विषय होता, तेव्हा मोहनने सातत्याने मुंबई विद्यापिठावर शिवसेनेचा भगवा फडकत ठेवला, बाळासाहेब ठाकरेंसाठीची त्याची श्रद्धा वर्णन करता येणार नाही, आज तो आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही, दोन दिवसांपूर्वी मी त्याच्याशी बोललो, मी त्याला विनम्र श्रद्धांजली वाहतो.
त्यांचं जाणं धक्कादायक, नवीन पिढीने त्यांच्याकडून शिकावं, ते अनेकदा तुरुंगातही गेले, त्यांच्या बोलण्यातून नेहमी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हेच कायम दिसले, तो कधीकाळी शिवसेनेचा एकमेव खासदार होता, गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून तो अख्ख्या संसदेवर भारी पडायचा,असे राऊत म्हणाले .