“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको
पाटणा (तेज समाचार डेस्क): पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणाच्या बदल्यात 100-100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा, अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या. चीनी सैन्यासोबत लडाखच्या गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले. शहीदांपैकी पाच जवान बिहारमधील होते. पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिलंय.
शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव विशेष विमानाने पाटणा विमानतळावर आणण्यात आले. तारापूर गावात शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झालं. दरम्यान, अखेरच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला नागरिक हातात तिरंगा आणि फुले घेऊन उभे होते.