अमळनेरच्या कोविड सेंटरमधील बेपत्ता वृध्द अपघातात ठार

Featured जळगाव
Share This:

प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी : माजी आ. स्मिता वाघ, खा. उन्मेश पाटील यांनी

प्रशासनाचे काढले वाभाडे, जबाबदार अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी

 

जळगाव ( रामदास माळी  ) : जिल्ह्यातील अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचे हाल होत असून उपचार आणि त्यांच्या भोजनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पोलिस प्रशासनही सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल करून कारवाईचा आव आणत आहे. म्हणून प्रशासन व प्रशासनातील पोलिस अधिकारी यांच्या दुलर्क्षामुळेच निष्पाप बापू निंबा वाणी या वृद्धाला अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या चार दिवसापूसन कोविड सेंटरमधून बेपत्ता वृध्द पारोळयात अपघातात ठार झाल्याने नागरीकांमधून संतप्त भावना उमटल्या आहेत. यातील तिघांना निलंबित न करता बडतर्फ करून थेट घरी पाठवण्यात यावे, अन्यथा गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या माजी आ.स्मिताताई वाघ ,खा. उन्मेश पाटील यांनी दिला आहे.
माजी आ. स्मिता वाघ यांनी सागितले की, अमळनेर येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगेश दगडू वाणी यांनी त्यांचे काका बापू निंबा वाणी यांचा स्वॅब घेण्यासाठी त्यांना ९ जुलै रोजी कोविड सेंटरला दाखल करून त्याची नोंदणी केली. मात्र त्यानंतर बापू वाणी हे चक्क तेथून गायब झाले. प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी, आरोग्य विभागाने आणि महसूल प्रशासनाने प्रत्येकाची जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट दाखवले म्हणजेच त्यांच्यात किती समन्वय आहे, हे यातून उघड झाले आहे. प्रातांधिकारी आणि पोलिस प्रशासनाला याचा जाबही विचारून वृद्धाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु दुर्दैवाने त्यांचा पारोळा येथे अपघात मृत्यू झाल्याने याला सर्वस्वी जबाबदार स्थानिक सह जिल्हा प्रशासनच आहे. प्रताप महाविद्यालयातून बाहेर जाण्यासाठी एकमेव रस्ता असून देखील वृद्ध बाहेर जातो कसा पोलिसांचे लक्ष नव्हते की पोलिस बंदोबस्ताला नव्हते, होते तर मग ते काय झोपा काढत होते की, मोबाइलवर खेळत होते, ऐवढा मोठा माणूस या सेंटरमधून बेपत्ता होतो आणि त्याचा पत्ताही कोणाला राहत नाही, यावरून स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणा खरोखरच काम करीत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवावर उठलेलेल्या प्रशाासनाचा हा प्रकार कदापी सहन केले जाणार नाही, याचा जाब प्रशासनाला द्यावाच लागेल, असे खा.उन्मेश पाटील म्हणाले.

जळगाव पाठोपाठ अमळनेरलाही प्रशासनाने केले बदनाम

जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृत्यूही असाच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला होता. राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव बदनाम झाले होते. तोच कित्ता अमळनेरचे स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेने गिरवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगावनंतर आता अमळनेर हे पोलिस यंत्रणा आणि अधिकार्‍यांच्या चुकांमुळे बदनाम झाले आहे. राज्यभर या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी सुरुवातीपासून अमळनेरकडे दुलर्क्ष केल्याने आज तालुक्यातील जनतेच्या मानगुटीवर कोरोना थैमान घालत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांची बदलीही झाली आहे. परंतु या प्रकरणात आम्हाला दोषी अधिकार्‍यांची बदली नको किंवा निलंबनही नको, त्यांना थेट बडतर्फ करून घरीच पाठवा, कारण सर्वसामान्यांचा जीव घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्ही मानवाधिकाराकडेही दाद मागणार आहोत.

चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करावी

वृद्धाचा बळी घेणार्‍यांवर कारवाईसाठी चौकशी समिती नेमण्यात यावी, यात ही खालच्या कमर्चार्‍यांपेक्षा प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे अपेक्षित आहे. ही चौकशी समिती नेमताना महसूल, पोलिस आणि आरोग्य विभाग या तिन्ही विभागांना जबाबदर धरून समिती नियुक्त करण्यात यावी, या समितीत स्थानिक कोणताही अधिकार्‍याचा समावेश नसावा, कारण येथील पोलिस आणि स्थानिक प्रशासनावरचा आमचा विश्वास उडाला आहे, स्वतःला वाचवण्यासाठी हे अधिकारी निष्पाप कनिष्ठ कमर्चार्‍यांचा बळीही देण्यास मगे पुढे पाहणार नाही, म्हणून पारदर्शक चौकशीसाठी बाहेरील जिल्ह्यातील अधिकार्‍यांची चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणीही माजी आ.स्मिता वाघ आणि खा.उन्मेश पाटील यांनी केली आहे.
Chaddha Classes
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *