कोरोनाच्या संकटातील अवलिया महापौर भारती सोनवणे!

Featured जळगाव
Share This:

देशात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक काही महिन्यांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला. एकीकडे जगात कोरोना डोके वर काढत असताना जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सौ.भारती कैलास सोनवणे यांना संधी मिळाली. महापौर पद हाती येताच सेवा परमो धर्म: तत्वाला अनुसरून भारती सोनवणे कामाला लागल्या. कुटुंब, घरकामाचे उत्तम नियोजन सांभाळणाऱ्या भारतीताई यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनासोबत उत्तम नियोजन केले. जनतेच्या सुरक्षिततेसाठी एखादा अवलिया धावून यावा तसे महापौरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र विविध उपाययोजना राबविल्या. संघ परिवार, भाजपच्या जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, पती नगरसेवक कैलास सोनवणे यांची खंबीर साथ असल्यानेच महापौर भारती सोनवणे यांचे सेवाकार्य अविरत सुरू आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना जनतेने त्यांना केव्हाच कोरोना योद्धाची उपमा दिली कळलेच नाही. आजही त्यांचे अविरत सेवा कार्य सुरूच आहे.

जळगाव शहराच्या महापौर सौ.भारती कैलास सोनवणे यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पदभार हाती घेतला. मनपाचा कार्यभार समजून घेत मागील आढावा घेण्यात फेब्रुवारी महिना उलटला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना जिल्ह्याच्या वेशीपर्यंत येऊन पोहचताच महापौरांनी नियोजनाला सुरुवात केली.

नियोजनासाठी बैठकांचा धडाका

गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव अधिक असल्याचे लक्षात घेऊन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मुस्लीम धर्मगुरू, मौलाना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनपात बैठक घेतली. नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जाताना वजू केल्यावर प्रत्येकाने वेगळा हातरुमाल वापरावा, फिजीकल डिस्टन्स ठेवावे अशा सूचना त्यांनी दिल्या. देशभर लॉकडाऊन होण्यापूर्वीच महापौरांनी इतरांना जागरूक करून आपलं कर्तव्य पार पाडले.

शहरातील प्रत्येक प्रभाग केला निर्जंतुक

जळगाव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर मध्यरात्रीच महापौर सौ.भारती सोनवणे त्याच्या कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी पोहचल्या. संपूर्ण परिसर रात्रीच स्वतः उभे राहून निर्जंतुक करून घेतला. जळगाव शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी महापौरांनी प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक गल्ली निर्जंतुक करून घेतली. काही ठिकाणी सामाजिक संस्थांची देखील मदत घेतली.

समुपदेशकाची बजावली भूमिका

एखाद्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरते परंतु महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्या परिसरात जाऊन समुपदेशकाची भुमिका निभावली. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना स्वतःची दक्षता घेण्याचा सल्ला दिला. नागरिकांनी घाबरू नये मात्र खबरदारी घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतःच देतात योगाचे धडे

जळगाव शहर मनपाकडून कोरोना बाधित असलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णांचे विचार सकारात्मक असावे, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी स्वतः योगशिक्षिका असलेल्या महापौर भारती सोनवणे यांनी कोरोना बाधित आणि विलगीकरण केलेल्या रुग्णांना योगा शिकविण्यास सुरुवात केली. दररोज योगाचे धडे दिले जात असल्याने रुग्ण लवकर बरे होण्याचा दर देखील वाढला. एरव्ही कुणीही लोकप्रतिनिधी कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळत असताना महापौर मात्र स्वतःच्या जिवापेक्षा जनतेला अधिक प्राधान्य देत आहे.

रुग्णांशी फोनवरून दररोज साधतात संवाद

कोरोना बाधित आणि विलगीकरण केलेल्या रुग्णांना मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर महापौर सौ.भारती सोनवणे स्वतः फोन करून त्यांच्याशी संवाद साधतात. कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या असुविधांचा आढावा घेऊन तात्काळ त्या सोडविण्याचा प्रयत्न महापौर करतात. रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना लवकर बरे होण्यासाठी महापौर शुभेच्छा देतात.

कोविड केअर सेंटरमध्येच घेतात नाश्ता, जेवण

कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा योग्य प्रकारचा नसल्याच्या तक्रारी काही रुग्णांनी महापौरांकडे केल्या. जेवण पुरवठादाराला वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसल्याने अखेर महापौर सौ.भारती सोनवणे यांनीच दररोज कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन चहा, नाश्ता आणि जेवण करण्याचा निर्णय घेतला. महापौर स्वतःच त्याठिकाणी जेवण करू लागल्याने अन्नपदार्थांचा दर्जा तर सुधारलाच शिवाय जेवण देखील वेळेवर मिळू लागले.

आधुनिक काळातील झाशीची राणी लक्ष्मीबाई

आपल्या देशातील शूर योद्धा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या प्रजेसाठी आपला जीव धोक्यात घालून लढा दिला होता. प्रत्येक भारतीयांच्या मनात त्या आजही अजरामर आहेत. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ.भारती कैलास सोनवणे या देखील आधुनिक काळातील झाशीच्या राणीच आहेत. कोरोना योद्धा म्हणून जळगावकर जनतेच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत कार्यरत आहेत. इतकंच काय तर रात्री अपरात्री केव्हाही, कुणीही त्यांना मदतीसाठी संपर्क केला तर त्या योग्य ती व्यवस्था करून देतात. आधुनिक तंत्राचा उपयोग करून त्या कायम सर्वांच्या संपर्कात राहतात. जनसेवा हेच जीवन म्हणून कार्यरत राहणाऱ्या महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या कार्याला मानाचा मुजरा..!

 

 

 

चेतन वाणी

98233 33119

 

Share This:

1 thought on “कोरोनाच्या संकटातील अवलिया महापौर भारती सोनवणे!

  1. खरोखरच अधुनिक काळातील झाशीच्या राणी. ताई आम्हास तुमचा मनापासुन अभिमान वाटतो…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *