
उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यांकडून शिकावी महाराष्ट्राने कोरोनाची लढाई – राजनाथ सिंह
उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यांकडून शिकावी महाराष्ट्राने कोरोनाची लढाई – राजनाथ सिंह
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधन करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाकरे सरकारवर तुफान हल्लाबोल केला. महाराष्ट्राने कोरोनाची लढाई कशी लढावी ते कर्नाटक आणि उ. प्रदेशकडून शिकावी, असा सल्ला देत महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस चालू असल्याची घणाघाती टीका सिंह यांनी केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातात जरी सत्तेची सूत्र असली तरी हे सरकार अकार्यक्षम आणि दिशाहीन सरकार असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात ज्या प्रकारे कोरोनाचा उद्रेक होतो आहे, तो चिंतेचा विषय आहे, असं म्हणत अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारला जी कोणती मदत लागेल ती मदत केंद्र सरकार करेल, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याच्या इराद्यात होती. मात्र जनमनाकौलापेक्षा स्वार्थ शिवसेनेने महत्त्वाचा मानला, अशी टीका करत महाराष्ट्र सरकारकडे विकासाचं अजिबात व्हिजन नाही. तीन पक्षांचं सरकार स्वार्थासाठी एकत्र आले आलं आहे, असं सिंह म्हणाले.
शिवसेनेकडे पाहिल्यानंतर ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे का? असा प्रश्न पडत असल्याचं सिंह म्हणाले. तर कोरोना आपत्तीला सामोरं जाण्यासाठी केंद्र सरकार तयारीत आहे, असंही त्यांनी सांगितलं.