सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी वंचित

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार ( वैभव करवंदकर ). शासनाने 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केलेला असतांना 2016 ते 2019 या कालावधीतील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व कुटूंबनिवृत्ती वेतन धारक लाभापासून अद्यापही वंचित आहेत. वारंवार पाठपुरावा करुन देखील सातव्या वेतनानुसार पेन्शन वाढ, पहिला हप्ता आणि फरकाची रक्कम मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित सेवापटपडताळणी कार्यालयाने त्वरीत पडताळणी करुन वंचित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना सातव्या वेतनानुसार लाभ मिळावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेने केली आहे.

यासंदर्भात यापूर्वी नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेवून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा करुन निवेदन दिले आहे. तसेच वेतन पडताळणी कार्यालय नाशिक, मुंबई यांनाही निवेदने देण्यात आली आहेत. परंतू, अद्यापपर्यंत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व कुटूंब निवृत्तीधारकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही. सन 2016 पासून सातव्या वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र 2016, 2017, 2018 व 2019 या चार वर्षाच्या कालावधीत सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना अद्यापपर्यंत सातव्या वेतनानुसार पेन्शन वाढ, पहिला हप्ता आणि फरकाची रक्कम मिळालेली नाही.

सुमारे 150 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे सेवापट हे जानेवारी 2020 पासून नाशिक येथील सेवा पटपडताळणी कार्यालयात पाठविण्यात आले आहे. या सेवा पटात त्रुटी आल्याने ते परत आल्यावर पुन्हा पुर्तता करुन पाठविले आहे. मात्र सात महिने उलटून देखील पट पडताळणीत दिरंगाई होत असल्याने सेवानिवृत्त व कुटूंब निवृत्तीधारकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी हे वयोवृध्द असून काहींचे निधनही झालेले आहे.

यासंदर्भात वारंवार संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असतांनाही लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. चार वर्षांपासून वंचित असलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि कुटूंब निवृत्तीधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार लाभ मिळावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष मोतीलाल ठाकूर, उपाध्यक्ष रमेश खवळे, साहेबराव सैंदाणे, विनायक राजपूत, प्रदिप पाटील यांनी निवेदनातून केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *