महाराष्ट्र: येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
महाराष्ट्र: येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
मुंबई (तेज समाचार डेस्क): अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील 48 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
चक्रीवादळ ओसरून पुढे मध्य प्रदेशाकडे कूच करताच, राज्यात पावसाने जरा विश्रांती घेतली आहे. मात्र, चक्रीवादळामुळे जमिनीवर आलेल्या बाष्पाच्या प्रभावामुळे कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने दक्षिण पश्चिम मॉन्सून हा सक्रीय झाला असून आता भारताच्या काही भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात भारताच्या दक्षिण पश्चिम भागात तसेच पश्चिम भारतात मॉन्सून अधिक वेगाने प्रवेश करण्याचे संकेत आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने दक्षिण पश्चिम मॉन्सून हा केरळमध्ये १ जूनला दाखल होईल असा अंदाज मांडला होता. तर मुंबईत ११ जूनला मॉन्सून दाखल होईल असे संकेत आयएमडीने दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक याठिकाणी पाऊस आणि वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.