
देशभरात ३ मे पर्यंत वाढला लॉकडाऊन
नई दिल्ली (तेज समाचार डेस्क): करोनाचा फैलाव वाढत असल्याने संपूर्ण देश ३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील सर्व नागरिकांना ३ मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले.पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होत. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केले.
पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. जगात करोनाचे संकट आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे नुकसान टळले आहे. कोणाला जेवणाचा, कोणाला येण्याजाण्याचा त्रास झाला, तुम्ही सगळयांनी हा त्रास सहन केला. तुम्ही शिस्तबद्ध सैनिकासारखे आपले कर्तव्य बजावत आहेत. मी तुम्हाला सलाम करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिला.