महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात विकेंड लाॅकडाऊन लावण्यात आला. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यानं आणि आगामी सार्वजनिक सुट्ट्या लक्षात घेता राज्यात पुन्हा पूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती दिली आहे.वाढत्या कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रात आता लॉकडाऊन अटळ आहे. राज्यात लॉकडाऊनची तयारीही सुरू झाली, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश रोपे यांनी म्हटलं आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. मुख्यमंत्री लवकरच लॉकडाऊनवर अंतिम निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
जवळजवळ समाजातील सर्व घटकांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. जवळजवळ सर्वांचे म्हणणे आहे की, राज्यात लॉकडाऊन लावायची गरज आहे. दारिद्रय रेषेखालील लोक आहेत त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली पण अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. शेवटी मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, उद्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षिय नेत्यांसोबत बैठक घेतली होती. त्यात राज्यात 8 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली होती.