
धुळे जिल्ह्यात उद्यापासून दीड दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’
धुळे (तेज समाचार डेस्क): ‘करोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी धुळे जिल्ह्यात शुक्रवार १० एप्रिल २०२० रोजीच्या रात्री १२ वाजेपासून ते रविवार १२ एप्रिल २०२० रोजीच्या पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ (संचारबंदी) करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप जगदाळे यांनी याबाबत आदेश काढला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच ‘करोना’ विषाणूचा प्रसार देशात व राज्यात गतीने होत आहे. राज्य शासनाने ‘करोना’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होवू शकते. तसेच पोलिस अधीक्षक यांनी सादर केलेला अहवाल पूर्णत: संचारबंदी लागू करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जगदाळे यांनी त्यांना प्राप्त अधिकारांनुसार संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम १४४(१)(३) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्या्वर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्यावर, गल्लीत संचार करणे, वाहतूक करणे, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करणारा आदेश काढला आहे. यात अत्यावयशक आरोग्य सेवा व कायदा सुव्यवस्था साठीचे मनुष्यबळ अपवाद असतील, असेही जिल्हाधिकारी जगदाळे यांनी म्हटले आहे.