
लॉक डाउन !! शाप की संधी ? – डॉ भोळे
नोव्हेंबर २०१९ पासून संपूर्ण जगावर करोनारुपी विषाणूंचे सावट पसरले.जागतिक महामारी जाहीर करण्यात आली. आजतायागत ४८ लाख लोकांना जगात या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली , जवळजवळ तीन लाख रुग्ण मृत्युमुखी पडले.विविध माध्यमातून आपला रोज करोना विषयी नवनवीन माहिती प्राप्त होते. अनेक देशांमध्ये लॉकडाउन म्हणजे संचार व जमावबंदी पाळण्यात येत आहे.’लॉकडाऊन’ हे थोडक्यात या संकटावर मात करण्यासाठी ‘आखण्यात येणारी धोरणे’ , ‘औषधे लस’ व इतर वैद्यकीय व्यवस्थेची तयारी यासाठी मागून घेतलेली वेळ ! (Time Please ). या लॉकडाऊनचे जनजीवनावर भलेही अनेक परिणाम झाले असतील, पण या लेखातून लॉकडाऊन ! शाप की संधी ? यांचे विश्लेषण करुयात.
जनसामान्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर सहाजिकच उत्तर मिळेल ‘शाप’.हो करोनाची साथ ही संपूर्ण जगासाठी विशेषता विकसित देशांसाठी फक्त आणि फक्त शापच म्हणावे.देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद पडले, उद्योग धंदे बंद पडले, बेरोजगारी वाढली,उपासमारी वाढली,व अनेक लोक विस्थापित झालेत. एकूणच संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली, शाळा महाविद्यालये व विद्यापीठे बंद पडली अशा अनेक अडचणींना जगाला तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे जगात सत्तर लाख अनावश्यक गर्भवती रुग्ण वाढण्याची अपेक्षा आहे. साहजिकच स्त्रियांच्या आरोग्याविषय़ी अडचणींचा हा प्रश्न आहे. यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवरील ओझेही निश्चितच वाढणार आह। भारतातील लोकसंख्येचा विचार केला तर हा प्रश्न अधिक चिंतेचा ठरणार आहे. कुणा व्यक्तीला करोना आजार होणे, एखाद्या रुग्णालयात करोनाचा रुग्णाचे निदान होणे व करोनामुळे मृत्युमुखी पडणे या गोष्टी जनतेला इतक्या भीतीदायक वाटतात की तो एक प्रकारचा कलंक किंवा काळीमा समजला जातोय.यावरून जगभरातील हे अरिष्ट एक महाभयंकर शापच आहे !!
लॉकडाऊनची दुसरी बाजू आपण तपासून बघायला हवी !
विकसित देशांसाठी लॉकडाऊन फक्त शापच असेल, तर विकसनशील व अविकसित देशांसाठी लॉकडाऊन निश्चितच एक संधी आहे ते कसे….
जागतिक स्तरावर लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फायदा दिसून आला तो वातावरणावर हवेतील प्रदूषण कमी झाले. देशाची राजधानी दिल्ली येथे प्रदूषण अत्यंत कमी झाले. जळगावातही सातपुडाच्या पर्वतरांगा डोळ्यांना सहज दिसू लागल्यात. अाकाशातील व झाडांवरील पक्ष्यांची संख्या वाढली.समुद्रातील दळणवळण बंद झाल्याने पाण्यातील प्रदूषण कमी झाले, परिणामी मोठमोठी कासवे व डॉल्फिनसारखी लुप्त समुद्रीय जीवसृष्टी पुन्हा समुद्र किनारी व गंगेच्या खोऱ्यात दिसली. यावरून प्रदूषणावर काम करण्याची व प्रबंध लिहिण्याची संधी निर्माण झाली !!
लॉकडाऊनमुळे वेळेअभावी दुर्लक्षित केलेली अनेक कामे घरी बसून पूर्ण करण्याची संधी आपल्याला मिळाली. आईवडील, पत्नी, मुलांना वेळ दिला जातोय.जुने छंद जोपासले जात आहेत. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढतो। वाचनासही वेळ मिळतो. करोना आजाराला दूर ठेवण्यासाठी घरीच किंवा गच्चीवर नेहमी व्यायामाचा आळस करणारे व्यायाम करीत आहेत,प्राणायम करीत आहेत. बाग काम करीत आहेत , घर काम केले जातेय. प्रत्यक्ष संपर्क करून नातेवाईकांची मित्रांची विचारपूस केली जाते, हे सर्वच विलक्षण वाटावे असेच आहे, पण ही संधी लॉकडाऊनमुळे उपलब्ध झाली !!
मागील काही वर्षांपासून स्वच्छ भारत हा उपक्रम राबविला जातो पण नागरिकांचा उपक्रमाचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.परंतु लॉकडाऊनच्या निमित्ताने करोनाच्या भयाने लोकांना स्वच्छतेचे महत्त्व कळले. आपला परिसर आपण स्वच्छ ठेवतोय, हात वारंवार धुतोय, जंतुनाशक द्रव्याचा हात धुण्यासाठी वापर करतोय, मास्क वापरतोय, रस्त्यावर थुंकणे बंद झाले, स्वच्छता ठेवून करोनासारखा आजार दूर करू शकतो हे आपल्याला समजण्याची संधी या निमित्ताने मिळाली .
वैयक्तिक स्वच्छता, परिसरातील स्वच्छता व सामाजिक स्वच्छता हा देश विकसित होण्याचा एक मुद्दा ठरू शकतो. भारतीय संस्कृतीतील एक जुनी पद्धत किती योग्य होती हे हे आता उमजल। घरात शिरण्यापूर्वी ओसरीत हात व पाय धुण्यासाठी पाणी, साबण व टॉवेल ठेवला जात असे, त्याचे महत्त्व आज अनेकांना उमगले . शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे दुर्लक्षित सार्वजनिक स्वच्छतेवर काम करण्याची व एकूणच स्वच्छतेची काही अलिखित नियम आपणा सर्वांना समजण्याची ही संधी !!
लॉकडाऊनमुळे दळणवळण मर्यादित झाल्याने अपघातांची संख्या कमी झाली. परिणामी अपघाती मृत्यू ही कमी झाला.हॉर्नचे आवाज बंद झाल्याने ध्वनी प्रदूषण कमी झाले.यामुळे अनावश्यक प्रवास, महागड्या वाहनांवरील अवास्तव खर्च व गरज नसताना हॉर्न वाजवण्याचा बेशिस्तपणा याचे महत्त्व जाणण्याची ही संधी !!
लॉकडाऊनमुळे बाहेरील अन्न खाण्यावर निर्बंध आल्याने पोटाचे विकार, अतिसार, टायफॉइड व कावीळ यासारख्या आजारांचे प्रमाण कमी झाले. बाहेरील अन्नावरील खर्चही अनावश्यक हे समजण्याची ही संधी ! दारू व सिगारेट तंबाखू मिळण्याची ठिकाणे बंद झाल्याने तात्पुरती का होईना लोकांची व्यसने सुटलीत.
महाराष्ट्र राज्याचा दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक परप्रांतिय मजूर आपल्या प्रांतात गावी परलेत. पण परप्रांतातून महाराष्ट्रात फक्त विद्यार्थी येतांना दिसलेत. बेरोजगारीचा जो प्रश्न अनेक वर्षांपासून आपणास भेडसावत आहे या दृष्टीने कुठल्याही कामाची लाज न बाळगता या मिळालेल्या संधीचा फायदा महाराष्ट्रातील तरुण घेऊ शकतात व मेहनतीेने अर्थाजन करु शकतात.
या संधीचे सोने करावयाचे असेल तर भारतीयांना काही सवयी कायमस्वरूपी बदलाव्या लागतील . स्वतःच्या अंतरंगात झाकून बघावे लागेल, मनातील साचलेली जळमटे काढावी लागतील, स्वतःच्या आरोग्यासोबत इतरांच्या व समाजाच्या आरोग्याचा विचार करावा लागेल. सामाजिक शारीरिक अंतर , मास्कचा वापर व सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वच्छता हे अलिखित नियम कायमस्वरूपी पाळावे लागतील. पारंपरिक जीवनपद्धती व पारंपरिक व्यवसाय याकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल.या निमित्ताने महामार्गांवरील काही फलक किती सूचक असतात याची जाणिव होते ; वेग मर्यादा पाळा अपघात टाळा ! सुरक्षित अंतर ठेवा !! तरुणाईच्या भाषेत सांगायचे झाले तर रिसेट रिबुट अँड रीस्टार्ट !!! चला तर या संधीतून नवीन विचारांची दिशा ठरवून ज्योत जागवू या !!!