भारतीय सैन्य मजबूत आणि सक्षम : लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क).

लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांनी 73 व्या सैन्य दिनानिमित्त पुण्यातील  राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण केले, तसेच दक्षिण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या लष्कर जनजागृती मोहिमेतील विजेत्यांचा सत्कार केला.


15 जानेवारी 1948 रोजी प्रथम भारतीय कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल (नंतर फील्ड मार्शल) के.एम. करिअप्पा, ओबीई यांनी भारतीय सैन्याची कमान ताब्यात घेतल्याच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी सैन्य दिन’ साजरा केला जातो.  भारतीय सैन्य मजबूत आणि सक्षम आहे ही सैन्य दिन 2021 ची संकल्पना आहे.

लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांनी राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीर सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.

आर्मी कमांडरांनी सर्व पदाधिकारी, बुजुर्ग, वीरांगना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या आणि मातृभूमीचे अंतर्गत आणि बाह्य विरोधकांपासून संरक्षण करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन त्यांनी  केले. ते म्हणाले की, कोविड महामारी काळातही शत्रूच्या कारवाया रोखण्यासाठी आणि सर्व आव्हाने पेलण्यासाठी लष्कराचा दक्षिण विभाग सदैव कार्यरत होता. कोणत्याही संकटात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना सतत सहाय्य करण्याच्या दक्षिण विभागाच्या बांधिलकीचेही त्यांनी आश्वासन दिले.

19 ऑक्टोबर 2020 ते 10 जानेवारी 2021 दरम्यान समाज माध्यमातून लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाद्वारे “भारतीय लष्कर विविधतेत एकतेचे प्रतीक” या संकल्पनेवर आधारित जनजागृती मोहिमेचा निकाल 73 व्या “सैन्य दिनानिमित्त” जाहीर करण्यात आला. व्हिडिओ बनविणे, चित्रकला, घोषवाक्य लेखन आणि छायाचित्रण अशा चार विषयांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लष्कराकडून तसेच नागरी समाजातर्फे दोन लाखांहून अधिक नोंदी आल्याने जबरदस्त प्रतिसाद लाभला.

राष्ट्रीय स्तरावरील 52 पारितोषिकांपैकी पुणेकरांना पाच वैयक्तिक पारितोषिके मिळाली. लष्कराच्या दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांनी विजेत्यांना बक्षिसे दिली.  त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सत्कार आणि अभिनंदन केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *