
“नव वर्षात करूया करोना विजयाचा संकल्प”- सरसंघचालक
नागपूर (तेज समाचार डेस्क): हिंदू नव वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशभरातील स्वयंसेवक आणि नागरिकांशी वॉनलाईन संवाद साधला.
‘करोना’ विषाणूमुळं निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत समाजाने सरकारच्या सूचनांचे पालन करून ‘करोना’वर विजय मिळवण्याचा संकल्प करावा,’ असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले आहे.
यासंदर्भातील आपल्या व्हिडीओ संदेशात सरसंघचालक म्हणाले की, संघाच्या परंपरेत चैत्र वर्ष प्रतिपदेला संकल्प दिवस मानले जाते. करोना संकटावर मात करण्याचा विजय संकल्प सर्वांनी करण्याची गरज आहे. देशात घोषित झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीतही आम्ही आमचे कार्य योग्य पद्धतीने करू शकतो. आम्ही आपल्या घरात राहून प्रार्थना करू शकतो. असामान्य परिस्थितीत नवी कार्यपद्धती स्वीकारून हे काम करू शकतो. सुसंस्कार आणि व्यक्तिनिर्माणाचे कार्य अशाही काळात अखंड सुरू राहू शकते किंबहुना तसे सुरू राहिले पाहिजे असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
करोनाचे संकट मोठे आहे यात वाद नाही. मात्र, समाजाच्या सामूहिक जबाबदारीतून या संकटावर यशस्वीरित्या मात करता येऊ शकते. औषधे व आरोग्याच्या इतर सोयीसुविधा या गोष्टी नंतरच्या आहेत. त्या सहाय्यक आहेत. मात्र, या विषाणू युद्धात लढताना पहिली आणि महत्त्वाची गरज आहे ती संसर्ग टाळण्याची. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हीच या लढाईतील प्रमुख बाब आहे. ती समाजानं पाळावी असे भागवत यांनी सांगितले.