
जॉगिंग साठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाची बिबट्याने केली शिकार
नाशिक (तेज समाचार प्रतिनिधि). संपूर्ण जगात या काळी कोरोनाचा प्रादूर्भाव आहे आणि देशात संचारबंदी आहे. या काळात लोकांना घरा बाहेर फिरणे मना असून सुद्धा अनेक लोक काही न काही कारणाने लॉकडाउन नियमांचा भग करीत आहे. नाशिक तालुक्यातील ऐकलहरे जवळील हिंगणवेढे गावात मित्रांसोबत पहाटे साडेपाच वाजता शेतमळे परिसरात जॉगिंगसाठी गेलेल्या एका 12 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. कुणाल योगेश पगारे असं या मुलाचं नाव आहे. या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी शेतमळे परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक तालुक्यातील ऐकलहरे जवळील हिंगणवेढे गावात रोजच्या सवयीनुसार आज पहाटे साडेपाच वाजता तीन मित्र व्यायामासाठी घराबाहेर गेले. गट क्रमांक 77 मध्ये नामदेव पाटील यांच्या ऊसाच्या शेताजवळ तिघे धावत असताना या तिघांना समोरच बिबट्या दिसला. त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी लगेच पळ काढला. मात्र, कुणाल धावत असतानाच बिबट्याने त्याच्या मानेवर हल्ला करत त्याला ऊसाच्या शेतात फरफटत नेले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे.
योगेश पगारे शेतकरी असून त्यांना कुणाल आणि एक मुलगी आहे. पगारे कुटुंबीयांच्या एकूलत्या एका मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत या गावातून बिबट्या दिसल्याची कोणतीही तक्रार आली नसल्याचे वनधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यात कुणालचा जागीच मृत्यू झाल्यामुळे त्वरित घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला असून गस्ती पथकाला तेथेच थांबण्याचे आदेश दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले.