
वाघळी, हिंगोणा खु.येथे वादळी पावसामुळे लिंबू बागा उखडल्या
लिंबू बागा उध्दवस्त, शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान
चाळीसगाव (रामदास माळी) : तालुक्यातील वाघळी, पातोडा, हिगोंणा परिसरात मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे शेती शिवारातील लिंबू बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. चक्री वादळामुळे लिंबू बागा मुळासकट उखडल्याने वादळाचा वेग किती असेल यांचा अंदाज येतो. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांचे लाखो रुपयाचा लिंबू झोपला आहे. लिंबूची झाडे मुळासकट उखडल्याने शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळले आहे. मात्र महसूल यंत्रणेतील अधिकार्यांना अजून कुठे काय? नुकसान झाले यांची माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
विशेषत: हिंगोण्याला लागून असलेल्या वाघळी परिसरात मोठ्या प्रमाणात लिंबू बागाचे नुकसान झाले आहे. चक्री वादळाच्या तडाख्यामुळे लिंबू बागा मुळासकट उपटल्याने शेतकर्यांनी परिश्रम घेऊन अनेक वर्षांपासून जगवलेल्या लिंबू बागा होत्याच्या नव्हत्या झाल्या आहेत. त्यामुळे या शेतकर्यांच्या पदरी निराशा पडली आहे. शेतकर्यांचे उत्पन्नाचे साधन वादळाने हिरावून नेले आहे. हिगोंणा शेती क्षेत्राला लागून असलेल्या वाघळी परिसरातील अशोक अर्जुन माळी, अभिमन्यू माळी, सुरेश गोविंदा माळी, तर हिंगोणा येथील वना भिवसन चव्हाण, धनराज रुपला चव्हाण, शरद बाजीराव पाटील, मीनाबाई उत्तम चव्हाण, मनिेषा शिवराम महाजन आदी शेतकर्यांच्या लिंबू उध्दवस्त झाल्या आहेत.
कोरोनाने आधीच कापूस, मका विकला जात नाही. त्यात निसर्गच्या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. चक्री वादळामुळे लिंबूची झाडे उखडली. या वादळामुळे नुकसान झालेल्या शेती परिसराला चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांनी तातडीने पाहणी करून भेट देण्याची गरज होती. मात्र महसूल यंत्रणा शेतकर्यांचे झालेले नुकसान गांभीर्याने घेत नसल्याचे महसूल अधिकार्यांनी दिलेल्या उत्तरावरून लक्षात येते.
कृषी विभागाकडून प्राथमिक अहवाल सादर
कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक नुकसानीच्या अहवालात वाघळी , हिंगोणा परिसरतील सुमारे ५० ते ६० एकरवरील सुमारे ७० शेतकर्यांच्या लिंबू बागा वादळी पावसामुळे बाधित झाल्या आहेत. लिंबू बागा वादळाने उखडल्याने मुळासकट उखडल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वाघळी, हिंगोणा परिसरात आचनक आलेल्या वादळामुळे लिंबू बागा पुर्णत: उध्दवस्त झाल्या आहेत.
कृषी विभागाची तत्परता
कृषी विभागाचे या परिसरातील कृषी सहायक सचिन मोरे आणि चारूदत्त पाथरे यांनी परिसरातील नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या लिंबू बागांना सकाळी सात वाजेच्या सुमारास भेट देऊन नुकसान झालेल्या बागाची माहिती घेतली. या वादळामुळे नुकसान झालेल्या लिंबू इतर बागांच्या क्षेत्राबाबत त्यांच्याकडून प्राथमिक अहवाल कृषी विभागातील वरिष्ठांना देण्यात येणार आहे. त्यानंतर महसूल विभागाला नुकसानीचे पंचनामे देण्यात येणार आहेत.
तलाठी यांना घटनास्थळी पाठवतो
परिसरात अतिवृष्टी नाही. मात्र वादळामुळे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी तलाठी व कृषी अधिकारी यांना पाठवितो.
– तहसीलदार अमोल मोरे, चाळीसगाव
संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या
वाघळी, हिंगोणा परिसरात झालेल्या नुकसानीबाबत मला माहिती मिळाली. तसेच बहुतांश शेतकर्यांचे फोनही आले. संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– आ.मंगेश चव्हाण, चाळीसगाव