जालना : दैठण्यात एकाच रात्री तीन घरफोडया
जालना (तेज समाचार प्रतिनिधि): एकाच रात्री एकाच गावातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री १५ फेब्रुवारी तालुक्यातील दैठणा खुर्द गावात घडल्या. या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैठणा खुर्द येथील भारत हरिभाऊ सवणे यांचे लहान भाऊ रामेश्वर हरिभाऊ सवणे हे दैठणा खुर्द येथे राहतात.ते कामानिमित्त बाहेरगावी गेले असता मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या जिन्यावरून घरात प्रवेश करून खोलीचे कुलूप तोडले.या खोलीच्या कपाटातील रोख रक्कम २५ हजार रुपये आणि ४१,४०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ६६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
तसेच गावात काही अंतरावर राहणाऱ्या अरुणाबाई नारायण पांडे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून त्यांच्या प्लास्टिक शोकेस मधील रोख रक्कम १९ हजार आणि ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
नंतर लगेच चोरट्यांनी परत गावातीलच गोविंद राजाभाऊ सवणे यांचेही घर फोडले. त्यांच्या लोखंडी पेटीतील ३६,५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.या तिघांच्या ही घरातील एकूण १ लाख ७१ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल चोरून नेला.ही घटना आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सानप,कॉन्स्टेबल भीमराव मुंढे,परतूर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल लोखंडे हे दुसऱ्या दिवशी सकाळी दैठणा खुर्द येथील घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ४५७,३८० खाली गुन्हा नोंद करून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सानप यांच्याकडे सोपविण्यात आला.मागील काही दिवसांपूर्वीच परतूर शहराच्या गाव भागात एकाच रात्री चार घरफोड्या झाल्या होत्या
त्याचाही तपास अजून लागलेला नाही तसेच ऑक्टोबर महिन्यात शहरातच रेणुकानगर भागातील दोन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली होती.