जळगाव: आप तो हमारे लिये खुदा हो ! रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकाचे असेही ‘ सेवाकार्य ‘

Featured जळगाव धुळे
Share This:

जळगाव: आप तो हमारे लिये खुदा हो ! रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकाचे असेही ‘ सेवाकार्य ‘

 

जळगाव (तेज समाचार डेस्क): लॉकडाऊनमुळे प्रवासासाठी वाहन नसल्याने कुटुंबासह गुजरातवरून आपल्या घरी उत्तर प्रदेशकडे पायी निघालेल्या एका गर्भवती महिलेची येथील रा.स्व.संघाच्या एका स्वयंसेवकाने सुखरूप प्रसूती केली – आणि समाजासमोर मानवतावादी सेवाकार्याचे एक आगळे उदाहरण ठेवले. ते दाम्पत्य म्हणाले ,’ आप तो हमारे लिये खुदा हो’!
उत्तर प्रदेशातील इठा गोरीगंज , ठाणे अमेठी येथील मूळ रहिवासी असलेले नूर मोहंमद हे गुजरातमधील सुरत येथे कापड विणण्याचे काम करतात. त्यात त्यांना पत्नी इशरत मोहंमद नूर मोहंमद यासुद्धा मदत करतात. त्यांना मोहंमद नुमान हा 3 वर्षांचा मुलगाही आहे.लॉकडाऊनमुळे पोट भरणे अवघड झाल्याने आपल्या गावी परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यातच हाताशी पैसेही जेमतेम असल्याने आणि वाहनाची व्यवस्था होऊ न शकल्याने हे कुटुंब सुरतवरून 5 मे रोजी पायी पायी चालत रस्त्याने निघाले.रस्त्यात मिळेल ते खाऊन त्यांचा प्रवास सुरु होता.पुरेसे सामानही नव्हते. त्यातच इशरत गरोदर असल्याने त्यांना अधिक त्रास होत होता.
सुरु झाल्या प्रसववेदना

गुरुवार,7 मे रोजी सकाळी हा परिवार जळगावला हायवेवरून येतांना लाकडी बॅट विक्रेत्यांच्या पालाशेजारी थांबला. त्यावेळी इशरत यांना प्रसववेदना होत होत्या.खूप रक्तस्रावही होत होता. ही बाब बॅट विक्रेत्या परिवाराच्या लक्षात येताच त्यांनी फोन करून रा.स्व.संघाचे स्वयंसेवक कवी कासार यांना कळविले. कारण कासार यांनी यापूर्वी अशी मदत केली होती. कवी कासार हे संघाच्या ‘ सेवालय’ च्या माध्यमातून गरजवंताला मदत करण्याचे काम करतात. ते ऍम्ब्युलन्ससह तेथे पोहोचले तेव्हा इशरत यांना अत्यंत रक्तस्राव होत होता आणि नूर मोहम्मद हे अत्यंत हवालदिल जाणवत होते. मदतीला कुणीही पुढे येत नसल्याचे पाहून परमेश्वरावर हवाला ठेवून कासार यांनी ऍम्ब्युलन्समध्येच इशरत यांची सुखरुप प्रसूती केली अन सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
त्यानंतर सर्वजण रा.स्व.संघाचे जळगाव शहर संघचालक डॉ.विलास भोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये आले.तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर इशरत आणि नवजात बाळाला गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.’ तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला, कारण वेळेवर उपचार झाले नसते तर काहीही अघटित घडू शकले असते’ या डॉक्टर्सनी व्यक्त केलेल्या भावनाच या घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देतात.

आप तो खुदा हो !

एका अपरिचीत गावात आमच्यासारख्या अनोळखी व्यक्तींनाही आपण जी मदत केली ती खूप मोलाची आहे.तुमच्यामुळेच हे दोन जीव वाचू शकले.’ आप तो हमारे लिये खुदा हो ‘ अशा शब्दात नूर मोहम्मद आणि इशरत मोहम्मद यांनी कवी कासार यांचे आभार मानले आणि आपली ही मदत , हे उपकार आम्ही आयुष्यभर लक्षात ठेऊ असे अभिवचनही दिले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *