जळगाव : पितृछत्र हरवलेल्या पोलीस पाल्यांनी मांडली महापौरांकडे व्यथा!

Featured जळगाव
Share This:

जळगाव : पितृछत्र हरवलेल्या पोलीस पाल्यांनी मांडली महापौरांकडे व्यथा!

जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार : महापौर करणार केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार
जळगाव (तेज समाचार डेस्क): आमचे वडील पोलीस होते. कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. उपचारासाठी आम्ही जिल्हा रुग्णालय गाठले परंतु तिथले वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आम्हाला उद्धटपणे वागणूक दिली. शक्य असूनही केवळ हलगर्जीपणा केल्याने आमच्या वडिलांना योग्य उपचार मिळू शकले नाही आणि आम्ही त्यांना गमावून बसलो, अशा शब्दात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांनी धाय मोकलून महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे व्यथा मांडली.
कोरोनामुक्त झालेल्या शहरातील १८ रुग्णांना शुक्रवारी कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्यांचे स्वागत करून कोरोनाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक, चेतन सनकत, डॉ.राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे आदी उपस्थित होते.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले १८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने शुक्रवारी त्यांना घरी सोडण्यात आले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी, सर्वांना स्वतःची काळजी घेत इतरांना देखील खबरदारी घेण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. तसेच कोरोनामुक्त झालेल्यांना आरोपीप्रमाणे वागणूक न देता त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागण्यास सांगावे, असा सल्लाही महापौरांनी दिला.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार
एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जिल्हा रुग्णालय प्रशासन कसे कारणीभूत ठरले. खाजगी डॉक्टरांकडून रुग्णांना मिळणारी वागणूक याबाबत दोन लेकींनी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे व्यथा मांडली. वडिलांचे झालेले हाल आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा झालेला मृत्यू याबाबत व्यथा मांडतांना दोन्ही मुलींना अश्रू अनावर झाले होते. दोन्ही मुलींचे सांत्वन करून महापौरांनी त्यांना धीर दिला. तसेच याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री ना.हर्ष वर्धन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे महापौरांनी त्यांना सांगितले.
खा.उन्मेष पाटील यांच्याशी केली चर्चा
जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे होत असलेले हाल आणि त्या पोलीस पाल्य तरुणींनी व्यक्त केलेली व्यथा लक्षात घेता नगरसेवक कैलास सोनवणे यांनी तात्काळ खा.उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली. खासदारांना सर्व हकीकत सांगून केंद्रीय समितीच्या सदस्यांशी मयताच्या कुटुंबियांची भेट घालून देण्याबाबत कैलास सोनवणे यांनी सांगितले.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *