जळगाव: विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार- कुलगुरू

Featured जळगाव
Share This:
जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ): शासनाकडून विद्यापीठ परीक्षा आयोजनाबाबत पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाणार असून तोवर विद्यार्थ्यांनी घरी राहून अभ्यास करावा व  परीक्षांच्या आयोजनाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेऊ नये तसेच घाबरून न जाता कोरोनो विषाणूच्या महामारी विरूध्द धैर्याने सामोरे जावे असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी केले आहे.
कुलगुरूंनी आपल्या आवाहनात सविस्तर भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॕकडाऊन व संचारबंदी लागू केली असल्यामुळे सर्व महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज घरी राहून सुरू आहे.
विद्यापीठाच्या मार्च /एप्रिल /मे २०२० मधील  सर्व प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.तसे यापूर्वी कळविण्यात आले आहे.
लाॕकडाऊन संपल्यानंतर परीक्षांच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांनी ६ एप्रिल रोजी व कुलपती तथा राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांनी ७ एप्रिल रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडिओ काॕन्फरसिंगद्वारे बैठक घेऊन संवाद साधला.या बैठकीत स्थगित परीक्षांचे आयोजन व निकाल , व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे आॕन लाईन तासिका, रासेयो स्वयंसेवकांचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात सहभाग, पुढील शैक्षणिक सत्र आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.जे विद्यार्थी आॕन लाईन तासिकांपासून वंचित राहिले त्या  विद्यार्थ्यांच्या तासिका लाॕकडाऊन संपल्यानंतर घेण्यात याव्यात असेही मंत्र्यांनी यावेळी सुचविले.   या चर्चेत सर्व कुलगुरूंनी आपआपल्या विद्यापीठातील परीक्षा आयोजनाची वस्तुस्थिती मांडली. मंत्री महोदयांनी सर्व विद्यापीठातील परीक्षा विषयक कामकाजात एकवाक्यता असावी यासाठी मुंबई विद्यापीठ , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एस.एन.डी.टी.विद्यापीठ मुंबई या विद्यापीठांचे कुलगुरू तसेच उच्च शिक्षण संचालक व तंत्र शिक्षण संचालक अशा सहा सदस्यांची समिती गठित केली आहे. या समितीने लाॕकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर परीक्षा कधी, कशा व कोणत्या कालावधीत घ्याव्यात तसेच त्याचे स्वरूप कसे असावे या संदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून शासनास अहवाल सादर करावा व शासनाच्या आदेशान्वये सर्व विद्यापीठांनी परीक्षांच्या आयोजनाबाबत कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने शासनाकडून परीक्षा आयोजनाबाबत निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार विद्यापीठाकडून कार्यवाही करण्यात येईल.तसेच सर्व घटकांना ही कार्यवाही कळविण्यात येणार आहे.त्याबाबतची माहिती विद्यापीठाच्या  www.nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा आयोजनाबाबत समाजमाध्यमामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता विद्यापीठाच्या अधिकृत संकेततस्थळावरील माहिती अधिकृत समजावी.
विद्यार्थ्यांनीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी तसेच घरी राहून अभ्यास करावा असेही आवाहन कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांनी केले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *