
कोरोना बाधीतांच्या तीव्रतेनुसार विभागणी करून जळगावकरांची करा तपासणी !
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश !
कोविड-१९च्या प्रतिकारासाठी निधीची कमतरता पडणार नसल्याची दिली ग्वाही
जळगाव ( प्रतिनिधी ) : – कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या भागांना त्याच्या तीव्रतेनुसार ए, बी आणि सी या तीन वर्गवारीत विभाजीत करून जिथे रूग्ण जास्त तिथे आधी या प्राधान्य क्रमाने तपासणी करुन कोरोना बाधित रुग्णाना सुपर स्पेशालीटी दर्जाची सेवा देण्यासाठी सज्ज अधिकार्यंनी प्रयत्नशील राहावे असे निर्देश आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. महापालिका क्षेत्रात कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी करण्यात येणार्या उपायोजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा विश्रामगृहात कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारांबाबत करण्यात येणार्या योजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यात प्रारंभी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि त्याबाबत करण्यात येत असलेल्या उपायांबाबत माहिती दिली. यात त्यांनी शहरातील रूग्णांना छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्याची माहिती दिली. शहरातील कोरोनाचा संसर्ग हा तुलनेत जास्त प्रमाणात असून मृत्यूचे प्रमाण देखील थोडे जास्त असल्याचे ते म्हणाले. महापालिकेच्या रूग्णालयात डॉक्टर्सची संख्या अपुरी पडत असल्याचे ते म्हणाले. महापालिकेला कोविड-१९ विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी मिळाला असून यातून सामग्री खरेदी करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावात नागरिकांची तपासणी करत असतांना ती सुनियोजीत पध्दतीत करणे गरजेचे आहे. यात जास्त रूग्ण असणारा भाग, मध्यम रूग्णसंख्येचा आणि कमी रूग्णसंख्येचे भाग यांना अनुक्रमे ए, बी आणि सी या वर्गवारीत विभाजीत करावे. आणि याच क्रमानुसार नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी दिले. कोरोना बाधीत रूग्णांना कोविड रूग्णालयात एखाद्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल प्रमाणे सुविधा मिळावी यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. कोविड रूग्णालयात नियमितपणे सॅनिटायझेशन व्हावे, ऑक्सीजनचा साठा पुरेसा रहावा अश्या सुचना त्यानी दिल्या . येथील पॉझिटीव्ह रूग्णांची दर दोन तासांनी तपासणी करावी, आयसीयू कक्ष व क्वॉरंटाईन कक्षाची नियमित स्वच्छता व्हावी, रूग्णालयातील स्वच्छतागृह व परिसराची नियमीत स्वच्छता करावी, कोरोना बाधीत व क्वॉरंटाईन रूग्णांसाठी सकस आहाराची व्यवस्था करावी, बाधीत रूग्ण व त्यांच्या आप्तांचे मनोधैर्य उंचावण्याचे प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. कोरोना बाधीत मयतांच्या पार्थिवाची अवहेलना होत असल्याचे आढळून आल्याने शहरात कोविडच्या रूग्णांसाठी एक स्मशानभूमि राखून ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, शहरातील तांबापुरा भागात रूग्ण आढळून आले असून येथे दाट वस्ती असल्यामुळे या भागातील प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात यावे अशा सूचना त्यांनी दिल्या. तर शाहू महाराज रूग्णालयात डॉक्टर्सची कमतरता असल्याने ग्रामीण रूग्णालयांमधून दोन डॉक्टर्सला तातडीने येथे रूजू होण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. दरम्यान, शहरातील वाघनगर परिसरातील पाण्याची टंचाई लक्षात घेता येथे दोन टँकर्सची तरतूद करण्याचेही त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.
माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील डॉ. डांगे हे वारंवार डीनच्या खुर्चीत बसत असून यामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे, अधिष्ठाता डॉ. बी. एन. खैरे, डॉ. किरण पाटील, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, डॉ रावलाणी ,माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक अमर जैन, नितीन बरडे यांची उपस्थिती होती.