
INS- VIRAAT: मुंबईहून गुजरातच्या दिशेनं अंतिम प्रवास- देशाला सलग 30 वर्ष सेवा
INS- VIRAAT: मुंबईहून गुजरातच्या दिशेनं अंतिम प्रवास- देशाला सलग 30 वर्ष सेवा
मुंबई (तेज समाचार डेस्क): भारतीय नौदालामार्फत देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएन.एस. ‘विराट’नं मुंबई बंदरातून गुजरातमधील अलंग बंदराच्या दिशेनं आपला अंतिम प्रवास सुरू केला. रविवारी मध्यरात्रीपर्यंत विराट तिथं पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिथं विराटला मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. साल 1987 ते 2017 अशी तीस वर्ष ही विश्वविक्रमी विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलातील सर्वात आघाडीची युद्धनौका म्हणून गणली गेली. सध्या हा मान आय.एन.एस. विक्रमादित्यकडे आहे.साल 1986 मध्ये ही युद्धनौका भारत सरकारनं सुमारे 65 कोटी डॉलर्सना इंग्लंडकडनं विकत घेतली होती. 1953 ते 1984 या काळात ही नौका ग्रेट ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचा भाग होती. त्यावेळी तिचं नाव एच.एम.एस. ‘हर्मिस’ असं होतं. त्यामुळे ही एक अशी युद्धनौका होती ज्यानं दोन देशांच्या नौदालासाठी काम केलेलं आहे. असा ऐतिहासिक वारसा लाभल्यानं या नौकेला ‘गँड ओल्ड लेडी’ या नावानं महासागरात एक विशेष ओळख प्राप्त होती. एका वेळी 2 हजारांहून अधिक सैनिकांचं वास्तव्य, फायटर विमानं, हेलिकॉप्टर्स आणि क्षेपणास्त्र वाहून नेण्याची विराटची क्षमता होती. 28 नॉटिकल म्हणजेच ताशी 52 किमी. वेगानं प्रवास करण्याची या युद्धनौकेची क्षमता होती. आय.एन.एस. विराट ही जगातील सर्वात प्रदिर्घकाळ सेवेत विमानवाहू युद्धनौका म्हणून गिनिज बुकातही तिची नोंद आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील 1971 चं युद्ध असो किंवा अरबी समुद्र आणि गल्फमधील युद्ध सराव आय.एन.एस.
विराटनं नेहमीचं भारताची शान कायम राखली. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आपल्या कुटुंबियांसह काही जवळच्या मित्रमंडळीना आय.एन.एस. विराटवरून लक्षद्वीप बेटांजवळ सहलीला घेऊन गेले होते. असा गौप्यस्फोट त्याकाळात एका नौदल अधिका-यानं केला होता.साल 2017 मध्ये नौदलानं आय.एन.एस. विराटला निवृत्त केल्याची घोषणा केली. त्यानंतर याचं संग्रहालय बनवण्याचा प्रस्तावही पुढे आला होता. मात्र, विक्रांतप्रमाणे विराटलाही मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनाकडनं घेण्यात आला. श्रीराम गुप्ता या कंपनीनं 38 कोटी 54 लाख रूपयांची बोली लावत ही नौका लिलावातून विकत घेतली. युद्धनौका असल्यानं तिचं धातूकाम हे अत्यंत उच्च दर्जाचं आहे. तसेच याचा बराचसा भाग हा बुलेटप्रूफ असल्यानं अनेकजण याचे अवशेष जमा करण्यास उत्सुक आहेत. विक्रांत प्रमाणे विराटच्या धातूसाठीही वाहननिर्मिती करणाऱ्या काही कंपन्या संपर्कात असल्याचं नव्या मालकांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे विक्रांतपासून बनवलेल्या एखाद्या मोटरसायकलप्रमाणे येत्या काळात विराटही एका नव्या रूपात चाहत्यांच्या भेटीसाठी येईल अशी अपेक्षा आहे.