
शहरी भागात अंगणवाडी केंद्रात सावळागोंधळ, लहान बालकांचा खाऊ कोण खात आहे ?
शहरी भागात अंगणवाडी केंद्रात सावळागोंधळ, लहान बालकांचा खाऊ कोण खात आहे ?
यावल शहरातील मातांची तक्रार
यावल (सुरेश पाटिल): शहरात अंगणवाडी मधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी अंगणवाडीमध्ये एकत्रित बसून गरम ताजा आहाराचा लाभ घेतात, यासह लहान बालकांना केळी, बिस्किट पॅकेट, खाऊ म्हणून सुद्धा वाटप करण्यात येते परंतु हा खाऊ वाटप करताना यावल शहरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये गेल्या तीन महिन्यापासून अनियमितपणा आणि पोषण आहार कमी प्रमाणात दिला जात असल्याच्या तक्रारी लहान बालकांच्या मातांनी केली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडील दिनांक 20 मार्च 2020 रोजी काढलेला आदेश प्रत्यक्ष बघितला असता त्यात त्यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग बाल विकास प्रकल्प अधिकारी ( नागरी ) सर्व यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत की, राज्यात सध्या कोरोना व्हायरसची साथ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने राज्यातील 104 नागरी प्रकल्पातील अंगणवाड्यांमध्ये लाभार्थ्यांना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत कळविण्यात आले होते काही जिल्ह्यांमध्ये यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांनी अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तथापि शासनाच्या उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक 4 नुसार नागरिक / ग्रामीण / आदिवासी प्रकल्पातील अंगणवाड्यांचे कामकाज पूर्णपणे बंद न करता अंगणवाड्या संदर्भात नव्याने प्राप्त झालेल्या आदेशानुसार खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात.
1 ) राज्यातील ग्रामीण नागरी आदिवासी प्रकल्पातील अंगण वाड्यातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी हे अंगणवाडीत एकत्र येऊन साथीचा प्रसार होऊ नये यासाठी सद्यस्थितीत पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येऊ नये.
2) अंगणवाडीतील 3 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी अंगणवाडीमध्ये एकत्रित बसून गरम ताजा आहाराचा लाभ घेतात त्यामुळे एकमेकाचा संपर्क होऊन साथीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे गरम ताजा आहार न देता त्या ऐवजी दि.20 मार्च 2020 पासून ते 15 मे 2020 पर्यंत (टी. एच. आर.) च्या स्वरूपामध्ये घरपोच आहार वाटप करण्यात यावे, या कालावधीमध्ये लागणाऱ्या टी. एच. आर. ची मागणी महाराष्ट्र स्टेट को ऑफ कंझ्युमर्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडे नोंदविण्यात यावी वरील कार्यपद्धतीनुसार आहार पुरवठा लाभार्थ्यांना वितरित होत असल्याचे सनियंत्रण पडताळणी करण्यात यावी असे सुद्धा आदेशात म्हटलेले आहे.
परंतु यावल शहरातील अंगणवाडी केंद्रामध्ये वरील सर्व नियम, अटी, शर्तीची आणि आदेशाची पायमल्ली करण्यात येत असून गेल्या तीन महिन्यापासून खाऊचे वाटपाचे प्रमाण संशयास्पद असून कमी प्रमाणात दिले जात असल्याच्या तक्रारी लहान बालकांच्या मातांनी केल्या आहे.
फोटोसेशन होत आहे
अंगणवाडी केंद्रातील लहान बालकांच्या हातात केळी किंवा बिस्कीटचे पॅकेट देऊन त्याचा फोटो काढल्यानंतर ती केळी आणि बिस्किट पुन्हा वापस घेतल्या जात असल्याच्या तक्रारी सुद्धा लहान बालकांच्या मातांनी केली आहे.
तरी शहरी विभागातील अंगणवाडी केंद्राचे वरिष्ठ अधिकारी यांनी जिल्ह्यातील शहरी विभागातील अंगणवाडी केंद्र चालकांची सखोल चौकशी करून तसेच लाभार्थी मुलांच्या मातांचे लेखी स्वरूपात जाबजबाब घेऊन वस्तुस्थिती जाणून घेऊन चौकशी करून कडक कार्यवाही करावी असे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे.