जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण पोहोचले 61 टक्क्यांवर

जळगाव
Share This:
  • जिल्ह्यात आतापर्यंत 32757 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी,
  • जिल्ह्यात सध्या 2163 ॲक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु,
  • जिल्ह्याचा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर 5.36 पर्यंत कमी करण्यात प्रशासनाला यश,   
  • जिल्ह्यात आतापर्यंत 3887 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

जळगाव,  (तेज समाचार डेस्क) : जिल्ह्यात आढळून आलेल्या 6393 कोरोना बाधित रुग्णांपैकी आज दिवसभरात (14 जुलै रोजी) 147 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 3887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 60.80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात गेल्या काही दिवसात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण वाढण्याबरोबरच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर हा 5.36 टक्यांपर्यत खाली आणण्यास प्रशासनास यश आले आहे. याबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी जिल्हा व पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणेसह सर्व कोरोना योध्दांचेही कौतुक केले आहे. कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालीकेपासून 92 वर्षीय आजीच्या तर समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेल्या रूग्णांसह अनेक कोरोना योध्दांचाही समावेश आहे.

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांच्या सहकार्याने व विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रूग्णांना वेळेवर आवश्यक ते उपचार तातडीने मिळावेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत असून त्यांना आयएमए चेही सहकार्य मिळत आहे. त्याचबरोबर राज्य शासनानेही बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टर व परिचारिकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करून रूग्णांना वेळेवर उपचार व औषधी मिळत असल्याने व नागरिकही वेळेत तपासणीसाठी येत असल्याने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रूग्णालय, कोविड सेंटर आणि अलगीकरण कक्षामध्ये रूग्णांना चहा, नाश्ता, जेवण आदि आवश्यक त्या सोईसुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, याकरीता प्रशासनाने बेडचे नियोजन केले असून जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये सद्य:परिस्थितीमध्ये 833 बेड तर अलगीकरण कक्षात 655 बेड उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालय व डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजसह शहरातील गणपती हॉस्पिटल व गोल्ड सिटी, भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल हे सर्व सुविधांसह कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत केले आहे. शिवाय नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील 33 हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केला आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आली आहे. याठिकाणी बाधित रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित 6393 रुग्णांपैकी आतापर्यंत 3887 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 32757 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत 32757 कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 24797 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 6393 अहवाल आले पॉझिटिव्ह आले आहे. शिवाय इतर अहवालाची संख्या 396 असून अद्याप 1171 अहवाल प्रलंबित आहे. जिल्ह्यात संशयित म्हणून तपासणी करण्यात आलेल्या 32757 व्यक्तींपैंकी 6393 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचा दर हा 19.51 इतका आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या

जळगाव शहर- 831, जळगाव ग्रामीण- 121, भुसावळ- 402, अमळनेर- 356, चोपडा-284, पाचोरा-89, भडगाव- 262, धरणगाव- 159, यावल -278, एरंडोल- 194, जामनेर-118, रावेर-250, पारोळा- 267, चाळीसगाव- 73, मुकताईनगर -83, बोदवड -112, इतर जिल्ह्यातील- 8 याप्रमाणे एकूण 3887 रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या 2163 ॲक्टीव्ह रुगण

जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 2163 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 1549, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 127, तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये 487 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये जळगाव शहर 676, जळगाव ग्रामीण 158, भुसावळ 127, अमळनेर 102, चोपडा 122, पाचोरा 38, भडगाव 10, धरणगाव 106, यावल 25, एरंडोल 104, जामनेर 225, रावेर 159, पारोळा 59, चाळीसगाव 71, मुक्ताईनगर 98, बोदवड 72, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 11 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील आढळून आले 6393 कोरोना बाधित रुग्ण

जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6393 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 1570, जळगाव ग्रामीण 298, भुसावळ 581, अमळनेर 488, चोपडा 429, पाचोरा 138, भडगाव 280, धरणगाव 284, यावल 326, एरंडोल 309, जामनेर 365, रावेर 441, पारोळा 333, चाळीसगाव 157, मुक्ताईनगर 185, बोदवड 190, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 19 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 1276 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 1276 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 462, शहरी भागातील 464 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 350 ठिकाणांचा समावेश आहे.

प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व्हेक्षणासाठी जिल्ह्यात 2494 टिम कार्यरत

कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्राचे सर्व्हेक्षणासाठी जिल्ह्यात 2494 टिम कार्यरत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 835, शहरी भागातील 974 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 685 टिम घरोघरी जाऊन तसेच नागरीकांची तपासणी करीत आहेत. या टिमच्या माध्यमातून जिल्हाभरात आतापर्यंत 1 लाख 63 हजार 316 घरांचे तर 7 लाख 34 हजार 201 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यापैकी 2 लाख 45 हजार 959 लोकसंख्या ग्रामीण भागातील तर उर्वरित लोकसंख्या नगरपालिका, नगरपंचायत व महापालिका क्षेत्रातील आहे.

कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यात प्रशासनास यश

जिल्ह्यात आतापर्यंत 343 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यापैकी 70 ते 75 टक्केपेक्षा अधिक रुग्ण हे 50 वर्षावरील तसेच त्यांना जुने आजार, विविध व्याधी असल्याचेही निदान झाले आहे. मागील महिन्यापर्यंत 12 टक्क्‌यांपर्यंत असलेला जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्युदर प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजना तसेच लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या सहकार्याने 5.36 पर्यंत कमी करण्यात प्रशासनास यश आले आहे. हा दर अजून कमी होण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा व त्वरीत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी इन्सिडन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, महापालिका क्षेत्रात आयुक्त सतीश कुलकर्णी तर नगरपालिका क्षेत्रात त्या त्या नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी, महसुल, पोलीस दलाचे इतर सर्व अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत असून त्यांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नागरीकांचेही चांगले सहकार्य लाभत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण कोरोनामुक्त होत आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

असे असले तरी नागरिकांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *