विकास दुबे गॅंगनं कशी केली 8 पोलिसांची हत्या?
विकास दुबे गॅंगनं कशी केली 8 पोलिसांची हत्या?
कानपूर (तेज समाचार डेस्क) : कानपूरमधील विकास दुबेची दहशत आता संपली आहे. विकास व त्याच्या टोळक्यानं बिकरू गावात काही दिवसांपूर्वीच आठ पोलिसांची हत्या केली होती. या पोलिसांच्या तुकडीत उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांचाही समावेश होता. मात्र विकासनं या पोलिसांची अत्यंत क्रुरपणे हत्या केली असल्याचं आता शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या तुकडीवर २ जुलै रोजी विकासच्या टोळक्यानं गोळीबार केला. तसेच धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला.
पोलिस उपअधीक्षक मिश्रा यांच्यावर टोळक्यानं चार वेळा गोळीबार केला, यात तीन गोळ्या त्यांच्या शरीरातून आरपार गेल्या. एक गोळी डोक्यात, एक छातीत आणि दोन गोळ्या मिश्रा यांच्या पोटात घुसल्या, यात मिश्रा यांचा मृत्यू झाला. मात्र आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर, दुबेच्या टोळीने मिश्रा यांचे पाय कापले. अन्य तीन पोलिसांच्या डोक्यात तर एकाच्या तोंडावर गोळ्या झाडण्यात आल्या. दुबेच्या टोळक्यानं केलेल्या निर्घृण हत्यांची शवविच्छेदन अहवालातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर आणि कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास दुबेचा एन्काऊंटर झालेला आहे. विकासची कानपूर भागात तब्बल २० वर्षांपासूनची दहशत होती. भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांची पोलिस स्टेशनमध्येच गोळ्या झाडून हत्या केल्यावर दुबेच्या दहशतीला सुरूवात झाली होती.
