
धुळे : गारपिट आणि अवकाळी पावसामुळे जमींदोज झाली गहू, मका, केळी, पपई, हरभरा पिके
शिरपूर (तेज समाचार डेस्क). मंगळवारी धुळे जिल्ह्यात अवघ्या 20 मिनिट गारपिटीसह झालेल्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. सायंकाळी शिरपूर शहरासह तालुक्यात आणि धुळे तालुक्यातील काही भागात झालेल्या बेमोसमी पावसाने गहू, मका, केळी, पपई, हरभरा इत्यादि पिके जमीनदोस्त केली आहेत. या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीच्या पावसात शिरपूर येथील राजेंद्र माळी या व्यक्तीचा मृत्यु झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
– जळगाव मध्ये सुद्धा प्रचंड नुकसान
जळगांव शहरासह तालुक्यातील भोकर, आव्हाणे, ममुराबाद, कानळदा, गाढोदा, किनोद गिरणा व तापी काठच्या गावांमध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपीटी झाली. त्यात गहू, हरभ-यासह केळीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सूमारेतासभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतक-याचे कंबरडे मोडले गेले आहे. आधीच ‘कोरोना’ मुळे शेतीचे व्यवहार ठप्प असताना आता निसर्गानेही आपले रौद्ररुप दाखविल्याने शेतक-यांचा चिंता वाढल्या आहेत.
म्हसावद, वडली, जळके या भागात वादळ होते. ऐन काढणीवर असलेल्या गहू व हरभ-याचा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तहसिलदार वैशाली हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार भोकर पट्टयात मोठे नुकसान झाले असून, या भागात अर्धातास गारपीट झाली आहे. रात्री उशीरापर्यंत नुकसानीचा आढावा घेतला जात होता.
– ममुराबादला घरांवरील पत्रे उडाले
परिसरात मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या गहू, दादर ज्वारी पिकांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले असून वादळामुळे काही घरांवरील पत्रेही उडाली आहेत.दिवसभर कडक ऊन व उकाड्याची स्थिती असतांना सायंकाळनंतर वातावरणात अचानक मोठा बदल झाला. वा-याचा वेग वाढून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यावर रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाट व पाऊस सुरू होता. साधारण पाच मिनिटे बोरांच्या आकाराची गार पडली. रस्त्यांवर तसेच घरांच्या अंगणात अक्षरश: गारांचा सडा पडल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकांचे गारपिटीमुळे काय हाल झाले असतील, या कल्पनेनेच शेतकºयांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. वादळामुळे दत्त मंदिराजवळील श्रीराम यादव यांच्या घरावरील पत्रेही उडाली.
– शेकडो हेक्टरवरील गहू झाला आडवा
२५ ते 3० किमी प्रतीतास वेगाने वाहणा-या वा-यामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, गाढोदा ते आव्हाणे या केळी पट्टयात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हजारो हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे. यासह पावसासह झालेल्या गारपीटीमुळे शेकडो हेक्टरवरील गहू व हरभ-याचे पिक अक्षरश आडवे झाले होते. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा आढावा घेवून शेतक-यांना मदत करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
वीज महामंडळाचे सर्वाधिक नुकसान
प्रचंड वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. वीज तारा तुटून पडल्यामुळे शिरपूर शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. धुळे तालुक्यातील काही भागात या पावसाचा फटका बसला आहे. या गारपिटीत गारांचा आकार लिंबाएवढा होता. त्यामुळे अनेक वाहनाच्या काचा फुटल्या. अवघ्या 20 मिनिटांच्या अवकाळी पावसाने पिकांचे, घरांचे आणि वीज महामंडळाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. या वीस मिनिटात शिरपूर शहरातील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नुकसानीची अंतिम आकडेवारी उद्या दुपारपर्यंत समोर येईल.