खोट्या बातम्या प्रकाशित करून द्वेषभावना निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजाने जागृत राहण्याची आवश्यकता; समाजसेवक अण्णा हजारे

Featured जळगाव
Share This:

खोट्या बातम्या प्रकाशित करून द्वेषभावना निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजाने जागृत राहण्याची आवश्यकता; समाजसेवक अण्णा हजारे.

यावल (सुरेश पाटील): औरंगाबाद येथील ‘लोकपत्र’या वर्तमानपत्रात ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात: अण्णा हजारे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यात आली.बातमी वाचून आश्चर्य वाटले.जे विधान मी केलेच नाही ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेषभावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली असे वाटते.अधिक चौकशी करता असे निदर्शनास आले की,सदर बातमी फक्त औरंगाबाद येथील लोकपत्र या एकमेव दैनिकात प्रसिद्ध झाली असून सदर दैनिकाचे औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक हे त्यास जबाबदार आहेत.
यापूर्वीही अनेकदा ‘दैनिक लोकपत्र’मधून माझ्याबद्दल आणि जन आंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या,लेख आलेले आहेत.अशीच एक खोटी बातमी छापल्याबद्दल आमचे वकील शाम असावा यांनी लोकप्रत्रचे रवींद्र तहकिक यांना13नोव्हेंबर2019 रोजी कारवाईसंबंधी कायदेशीर नोटीस बजावली होती ही नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती म्हणून त्यानंतर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले व कारवाई करण्याचे टाळले होते परंतु आता पुन्हा त्यांनी अशीच खोटी बातमी छापून शिक्षक,पालक व विद्यार्थी वर्गामध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य असलेली नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात.त्यामुळे समाजात शिक्षकाविषयी आदराची भावना आहे.मीही शिक्षकाविषयी नेहमीच आदर व्यक्त केलेला आहे.परंतु दोन दिवसापूर्वी लोकपत्र मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मला खेद वाटला.तसेच संपूर्ण शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे सोशल मीडियावरून दिसून आले. ही बाब समाजाच्या दृष्टीने चांगली नाही.मी नेहमी सांगत असतो की, दिवसेंदिवस वाढती द्वेषभावना ही समाज व देशासाठी घातक आहे. काही अविचारी लोक समाजात दुही,देशभावना आणि तेढ निर्माण होईल असा प्रयत्न सातत्याने करीत असतात.त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असते.
वास्तविक पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलेला आहे.त्‍यामुळे पत्रकारांनी व माध्यमांनी अत्यंत जबाबदारीने वागले पाहिजे पण या क्षेत्रातही काही अपप्रवृत्ती असल्याचे सदर बातमी वरून दिसून येते.त्यातूनच अशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात.औरंगाबाद येथील ‘लोकपत्र’या वर्तमानपत्रातून यापूर्वी अनेक वेळा माझ्याबद्दल तसेच शिक्षकांबद्दल ही चुकीच्या बातम्या छापलेल्या निदर्शनास आलेल्या आहेत.परंतु समाजाने जागरूक राहून अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये.समाजातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील असा विचार करावा.शिक्षकी पेशा हा एक पवित्र पेशा आहे.शिक्षकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच गैरसमज करून न घेता आपले ज्ञानदानाचे पवित्र काम सुरू ठेवावे.
आमच्या वकिलांनी लोकपत्रच्या कार्यकारी संपादकाच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच त्यांना संबंधित नोटीस बजावण्यात येईल व कारवाई सुरू करण्यात येईल असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात समाज सेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *