फटाक्यांनी भरलेले अननस खायला घालून गर्भवती हत्तीला मारले

Featured देश
Share This:

फटाक्यांनी भरलेले अननस खायला घालून गर्भवती हत्तीला मारले

केरळ (तेज समाचार डेस्क): मल्लपुरम जिल्ह्यातील एका गावात फटाक्यांनी भरलेलं अननस गर्भवती हत्तीणीला खायला देण्यात आलं. ते खाल्ल्यानंतर, अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. कुठून येते इतकी क्रूरता, असा पहिला विचार बातमी वाचताना मनात आला. यानंतर या बातमीसंदर्भातल्या प्रत्येक घटना वाचत असताता सतत हाच विचार मनात घोळतोय, की तुम्ही सुशिक्षत असला की सगळं काही साध्य होतं अशातला भाग नाही.

लहानपणी आजी सांगायची की माणूस हा प्राणीच मुळात वाईट. आपल्या स्वार्थासाठी जनावरं कापतो, त्यांना खातो वगैरे, वगैरे… लहानपणी आजीची ही गोष्टी ऐकताना फारसं काही कळायचं नाही. पण नंतर-नंतर देशात प्राण्यांवर अत्याचार होत असतानाच्या काही घटना वाचल्या की आजीची गोष्ट कायम लक्षात येते. माणूस हा प्राणीच मुळात वाईट. कोणी आपल्या पाळीव कुत्र्याला निर्जन रस्त्यावर सोडून जातं, कोणी एक धनाढ्य बाई कुत्र्याच्या पिल्लांना गाडीखाली चिरडते, कोणी एक मुलगा घराच्या खिडकीतून पिल्ल खाली फेकतो असे एक ना अनेक प्रसंग आजपर्यंत आपण पाहीलेत..त्या त्या वेळेपुरतं आपल्याला वाईटही वाटतं. पण केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांनी तिच्या पोटातून मृत पावलेलं लहान पिल्लू बाहेर काढतानाचे फोटो पाहिले त्यावेळेला मला आजीची गोष्ट समजली, माणूस हा प्राणीच वाईट.

केरळमधील वन-विभागात काम करणारे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली. त्यांनी सांगितलेला अनुभव हा क्षणोक्षणी तुम्हाल माणूस म्हणून स्वतःचीच चीड आणणारा आहे. फटाक्याचा स्फोट झाल्यानंतर हत्तीणीच्या तोंड आणि सोंडेला चांगलीच दुखापत झाली. वेदना सहन होत नसल्यामुळे ती गावभर सैरावैरा पळत होती. पण अशा परिस्थितीतही तिने कोणत्याही माणसावर किंवा कोणत्याही घरावर हल्ला केला नाही. कदाचित त्यावेळी तिच्या डोक्यात आपल्या पोटात असणाऱ्या बाळाचा विचार असावा. माणसं आपल्याशी वाईट वागली, म्हणून आपणही त्यांच्याशी तसंच वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय उरला असं तिला नक्कीच वाटलं असणार. स्फोटामुळे होत असलेल्या वेदना, पोटात भूक लागलेली असतानाही काही खाता येत नसल्यामुळे अखेरीस ही हत्तीण नदीत जाऊन उभे राहिली.

मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टनुसार, या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वन-अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. दोन हत्तींना नदीकिनाऱ्यावर आणत तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. पण माणसाच्या नीच स्वभावाची एकदा ओळख झाल्यानंतर या हत्तीणीने पाण्याबाहेर येणं पसंत केलं नाही. शवविच्छेदन करत असताना डॉक्टरांनी ही हत्तीण गर्भवती असल्याचं सांगितलं. आपल्याला जे सोसावं लागलं ते आपल्या मुलाला सोसावं लागू नये, कदाचीत याच विचारातून तिने पाण्यात उभं राहून आपला अखेरचा श्वास घेतला. अनेकदा माणूस जनावरासारखा वागला असं आपण ऐकतो, पण केरळमध्ये झालेला हा प्रकार सैतानी मनोवृत्तीचा आहे. आपल्यावर संकट आल्याशिवाय मुके प्राणीवर कोणावरही हल्ला करत नाही, पण माणसाचं तसं नसतं ना…आणि इथेच
सगळा घोळ झालाय.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *