धुळे : वीडीच्या थोटक्यावरून पोलिसांनी लावला चोरांचा छडा

Featured धुळे
Share This:

 

धुळे (तेज समाचार डेस्क).  धुळे जिल्ह्यामध्ये थैमान घालणाऱ्या घरफोडी टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनास्थळी आढळलेल्या बिडीच्या थोटकावरुन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

साक्री तालुक्यातील सामोडे याठिकाणी एका घरामध्ये पहाटेच्या दरम्यान या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत घरातील एकूण आठ लाख 87 हजारांचा मुद्देमाल चोरला होता. तसेच शिंदखेडा तालुक्यातील एका कंपनीमध्येही तब्बल 66 इलेक्ट्रॉनिक मोटारी या चोरट्यांनी चोरल्या होत्या.

पोलिस प्रशासनाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आपली तपासाची चक्र फिरवली असता या दोन्ही चोरींमध्ये पोलिसांना अर्धवट जळालेली बिडीची थोटकं आढळून आलीत. या बिडीच्या थोटकांवरुन पोलिसांनी एकाच टोळीने या दोन्ही चोर्‍या केल्या असल्याचा अंदाज बांधला आणि त्या अनुषंगाने आपला तपास सुरु केला होता.

दरम्यान, पोलिसांना तपासादरम्यान घरफोड्या करणारी ही टोळी मध्यप्रदेश मधील असल्याचं समजलं. लाल्या उर्फ रवी देविलाल फुलेरी या चोरट्याने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने या चोऱ्या केल्या असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *