मॉल, लॉज, हॉटेल मध्ये जाताय, पाळा हे नियम

Featured पुणे
Share This:

पुणे  (तेज समाचार डेस्क) : पुण्यात लॉज, गेस्ट हाऊस, निवासी सुविधा असलेल्या हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर उद्यापासून (5 ऑगस्ट) हे व्यवसाय सुरु होतील. मात्र जेवणाची सुविधा देणाऱ्या रेस्टॉरंट मालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत पुणे महापालिका प्रशासनाने सोमवारी उशिरा नियमावली जाहीर केली. पुण्यात लॉज, गेस्ट हाऊस, निवासी सुविधा, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करण्यात येणार आहेत. अटी आणि शर्तीनुसार पालिका प्रशासनाने उद्यापासून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर हे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली.

– मॉलमध्ये मुलांसाठी खेळण्याची जागा आणि गेम परिसर पूर्णपणे बंद राहील. त्याचबरोबर मॉलमधील सिनेमागृह, फूड कोर्ट, रेस्टॉरंट नागरिकांसाठी बंद असतील. मात्र फूड कोर्ट, रेस्टॉरंटमधील तयार पदार्थ घरपोच सेवा देता येणार आहेत.

– या नियमावलीनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटेल, लॉज, अतिथीगृह पूर्ण बंद राहतील, तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर हे व्यवसाय 33 टक्के क्षमतेने सुरु होतील. सर्व व्यावसायिकांनी दर्शनी भागात कोव्हिड सूचना फलक लावावेत. व्यावसायिकांनी हॉटेल पार्किंग आणि आवारात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

– बैठक व्यवस्था आणि रांगेत सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी खुणा कराव्यात, सोशल डिस्टन्स राखावे. रिसेप्शन टेबलच्या जागेभोवती काचेचे आवरण असावे. प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग व्यवस्था करावी, अशाही सूचना केल्या.

– ग्राहकांना हात धुण्यासाठी सॅनिटायझर, कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे उपलब्ध करुन द्यावेत. हॉटेलमध्ये ऑनलाइन आर्थिक व्यवहार करावेत. हॉटेलमध्ये इ मॅन्युएल, एकदा वापरात येणारे कागदी रुमाल वापरावेत. ग्राहकांचे ओळखपत्रासह प्रवासाची माहिती, आरोग्य स्थिती, स्वयंघोषणापत्र रिसेप्शनवर भरुन घेण्याची सोय करण्याची सूचना पालिका आयुक्तांनी केली.

– कोरोना लक्षणं नसणाऱ्यांनाच प्रवेश द्यावा. आरोग्य सेतू अतिथीला वापरणं बंधनकारक करावं. सामाजिक अंतर राहील अशी बैठक व्यवस्था करावी. लहान मुलांचे खेळ, व्यायाम शाळा आणि जलतरण बंद राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

– ग्राहक हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर खोलीतील सर्व पडदे, चादर आणि इतर गोष्टी त्वरित बदलाव्यात. संबंधित रुम 24 तासांसाठी रिकामी ठेवावी. आवारातील स्वच्छतागृह, पिण्याचे पाण्याचे ठिकाण, हात धुण्याचे ठिकाण आणि इतर परिसरात निर्जंतुक करण्याची सूचना करण्यात आली.

– विश्रामगृहाच्या दरवाजाच्या कड्या, लिफ्टची बटणेची निर्जंतुकीकरण करावं. सर्व स्वच्छतागृहांची वेळोवेळी निर्जंतुक करावं. कर्मचारी आणि अतिथीनी वापरलेले मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावण्याची सूचना आहे.

– प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर मॉल सुरु राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील मॉल बंदच राहणार आहेत. दोन व्यक्तींमधील सहा फुटाचे अंतर बंधनकारक आहे. मास्क आवश्यक असून हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबणाची व्यवस्था करण्याचे निर्देश आहे.

– ग्राहकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू वापरणं बंधनकारक, थर्मल स्क्रीनिंग आवश्यक, 65 पेक्षा अधिक वयाच्या आजारी व्यक्ती, गरोदर महिला आणि लहान मुलांना प्रवेश न देण्याची सूचना आहे.

– गर्दी टाळण्यासाठी नियंत्रीत प्रवेश, लिफ्टचा वापर करत असल्यास मर्यादित संख्या, संपर्क होणारे ठिकाणांवर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *