
जर्मनी: दुसऱ्या महायुद्धाच्या काळातला 500 किलोचा बॉम्ब केला निकामी
जर्मनी: दुसऱ्या महायुद्धाच्या काळातला 500 किलोचा बॉम्ब केला निकामी
फ्रँकफर्ट (तेज समाचार डेस्क): जर्मनीची आर्थिक राजधानी फ्रँकफर्टमध्ये कनव्हेंशन सेंटरजवळ दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ५०० किलोग्राम वजनाचा बॉम्ब शुक्रवारी सापडला. अग्निशामन दलाने हा बॉम्ब निकामी केला. यासाठी दोन हजार ७०० लोकांना जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.
फ्रँकफर्ट येथील कनव्हेंशन सेंटरजवळ खोदकाम सुरू असताना मंगळवारी हा ५०० किलो (एक हजार १०० पाऊण्ड) वजनाचा बॉम्ब सापडला होता. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बॉम्ब सापडलेला परिसर पोलिसांनी रिकामा करुन प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला. शुक्रवारी या भागामधील सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. या भागात असणारे फ्रँकफर्ट प्राणी संग्रहायलही बंद ठेवण्यात आले होते. काही रुग्णांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या परिसराच्या आजूबाजूला राहणाऱ्या दोन हजार ७०० लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना देण्यात आली. हा बॉम्ब हा अमेरिकन बनावटीचा होता. बॉम्ब निकामी करण्यात यश आल्याची माहिती सरकारी प्रवक्त्याने दिली आहे.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की जर्मनीमध्ये खोदकामात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातले असे बॉम्ब अनेकदा सापडतात. दुसरे महायुद्ध संपून ७५ वर्षे झाली आहेत. २०१७ साली सप्टेंबर महिन्यात एक हजार ६०० किलोचा बॉम्ब सापडला होता. हा बॉम्ब निकामी करण्याआधी सुरक्षेचा उपाय म्हणून ६५ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.