धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी २७ एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित

Featured धुळे
Share This:

जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती, नागरिकांनी घाबरू नये, घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार

धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे शहरात करोना विषाणूचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत आज मध्यरात्रीपासून ते २७ एप्रिल २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
धुळे शहरात सहा, तर शिंदखेडा व साक्री तालुक्यात प्रत्येकी एक करोना विषाणूबाधित असे एकूण आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य रुग्णांवर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय या शासनाने घेतला आहे.

धुळे जिल्ह्याला लागू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात व मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा गावात करोना संसर्गाची लागण झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच धुळे शहरात सहा करोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी एक करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूच्या प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असल्याने जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही संचारबंदी लागू राहील.

या संचारबंदीतून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व त्या अनुषांगिक सेवा, औषधे विक्रीची दुकाने, किराणा दुकाने, दूध, भाजीपाला व फळ विक्री दुकाने, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व कायदा सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बँक यंत्रणा, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी वगळता अन्य सर्व व्यवहार हे दिलेल्या कालावधीत व अटीस अधिन राहून बंद राहतील.

कोविड-१९ प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील अधिकृत किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत सुरु राहतील व दूध विक्रेत्यांसाठी पहाटे ५ ते दुपारी १२, तर पेट्रोलपंपचालकांसाठी ही वेळ सकाळी ६ ते दुपारी २ अशी असेल. तसेच सदरचा आदेश हा सद्य:स्थितीत व भविष्यात कोविड-१९ प्रतिबंधित क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रास लागू राहणार नाही. सदरच्या प्रतिबंधीत क्षेत्रात कन्टेन्मेंट अधिसूचनेनुसार घोषित प्रतिबंधानुसार अंमलबजावणी होईल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य ती कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी संंजय यादव यांनी म्हटले आहे.

नागरिकांनी घाबरून जावू नये : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे शहरात आढळून या विषाणूचे संक्रमण होवून रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये. नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठीच हा निर्णय घेतला आहे. या कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध होतील. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *