
सुदैवाने धुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण नाही मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पणे पालन करावे – पालकमंत्री
धुळे (तेज समाचार प्रतिनिधी ): जगभरात तसेच देशात व राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. असे असताना धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुदैवाने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले नाही. याचे श्रेय धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल व इतर प्रशासकीय विभाग तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांना जाते. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आजपर्यंत धुळे जिल्हा कोरोना पासून सुरक्षित आहे. असे असले तरी कोरोणा सोबत ची आमची लढाई अद्याप संपली नाही, म्हणून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे असे अवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
कोरोना विषयाबाबत सद्यस्थितीची माहिती देत असतांना ना. अब्दुल सत्तार म्हणाले की, आज रोजी जिल्ह्यात स्क्रीनींग द्वारे 73 जणांची रुग्ण तपासणी करण्यात आली. यातील 72 जणांवर उपचार करण्यात आले. त्यातील एक जण दवाखान्यात उपचार घेत असून एकाचा रिपोर्ट येणे बाकी आहे. अद्याप पर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. तपासणी अंती 126 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असून 41 जणांना होम क्वांरंटाईन करण्यात आलेले आहेत. यामध्ये 3 हजार 265 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 3 हजार 264 जणांवर उपचार करण्यात आले. तर आतापर्यंत 1 हजार 106 जणांना होम क्वांरंटाईन करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या संकट काळात प्रशासनाने दिलेल्या सूचना व आदेशाचे धुळेकरांनी काटेकोरपणाने पालन केले. कोरोनाशी सामना करीत असताना धुळे जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील तमाम नागरिकांचा या संकट काळात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. यातून धुळे कर यांची जागृतता व एकता दिसून आली. याबाबत धुळे जिल्ह्यातील जनतेचे मी अभिनंदन करतो तसेच आभार ही व्यक्त करतो.
धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, हिरे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे ,जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ , जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, बीडिओ उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आपण सर्व अथक परिश्रम करून जनतेसाठी अहोरात्र काम करीत आहात. ही अभिमानास्पद बाब आहे .
जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या जिल्ह्यासाठी सर्व अधिकारी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक बाबीवर मी बारीक लक्ष ठेवून आहे. तिकडे काय घडते त्याची मला त्वरित माहिती मिळते. धुळे येथील पालकमंत्री कार्यालयात माझे ओ. एस.डी. श्री. प्रशांत ठाकरे हे तेथे गेल्या पंधरा दिवसापासून तळ ठोकून आहेत. आरोग्य विभागाने या कोरोना संकटाच्या कालावधीत चांगल्या पद्धतीने काम केले आहे .
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व्ही.आर.डी .एल . प्रयोगशाळा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या प्रयत्नाने तात्काळ सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हिरे महाविद्यालयातील व्ही. आर. डी. एल. प्रयोगशाळा ही उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच प्रयोगशाळा असून येथे नंदुरबार, जळगाव, नाशिक इत्यादी जिल्ह्यातील नमुने तपासणी साठी येतात. त्यामुळे जनतेने काळजी करण्याची गरज नाही. या प्रयोग शाळेतील सर्वच अधिकारी – कर्मचारी या महिला आहेत. त्यांचे मी यावेळी विशेष अभिनंदन करतो. कोरोनाच्या साथीमध्ये जिल्ह्याचे प्रशासन अत्यंत एकजुटीने काम करीत आहे हे एक प्रशंसनीय काम आहे. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपण तात्काळ व्ही.आर.डी.एन. प्रयोगशाळा तयारी तसेच मी पालकमंत्री झाल्यानंतर मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा. अजित पवार साहेब यांना धुळे येथे तत्काळ एम.आर.आय. मशीन खरेदीसाठी निधीची मागणी केली होती. त्या अनुशंगाने वित्तमंत्री अजित पवार यांनी यासाठी मंजुरी दिलेली असून आता धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थोड्याच दिवसांत एम.आर.आय. सेवा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक ती औषधे , मास्क, ग्लोज, विविध आरोग्याशी संबंध साधनसामग्री खरेदी करण्यासाठी यापूर्वीच रुपये चार कोटी इतका निधी देण्यात आलेला आहे. अजूनही लागला तर निधी देण्यात येईल. शासन कुठे कमी पडणार नाही याबाबत आपण निश्चित रहावे. धुळे जिल्ह्यात जर तर यापुढे कोरोना चा रुग्ण आढळलाच तर त्यांच्यासाठी मनपा हिरे महाविद्यालय येथे आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वेगळे 160 बेडचे विलगीकरण कक्ष, व्हेंटिलेटर्स सह तयार करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला आवश्यक तो अन्नधान्य यापूर्वीच रेशन दुकानामध्ये उपलब्ध करून दिलेला असून त्याचे वाटप नियमानुसार सुरू झाले आहे . जिल्ह्यात मनपा हद्दीत 7 व ग्रामीण भागात 8 अशा एकूण 15 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली असून तेथे नमूद केलेल्या वेळेत 5 रुपयांमध्ये जेवण मिळत आहे.
धुळे जिल्ह्यात बाहेरून आतापर्यंत आलेल्या सर्व संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून त्या सर्वांच्या टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वच निगेटिव आलेले आहेत.
धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी किराणामाल ,भाजीपाला, दूध, चिकन- मटण शॉप ,फळे यांची दुकाने उघडे असून पुरवठा व्यवस्थित सुरू आहे . सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करीत आहेत. जर कोरोना संबंधी तुम्हाला संशय – शंका असेल तर मनपा हेल्पलाईन क्रमांक 02562 – 288320 वर संपर्क करा. शासनाचा टोल फ्री क्रमांक 104 वर सुद्धा आपण कॉल करू शकतो. वरील सर्व क्रमांक नागरिकांच्या सोयीसाठीच आहेत .
परिस्थिती गंभीर असले तरी सरकार हे खंबीर आहेत. कोरोना वर मत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या हाकेला आपल्याला साथ द्यायची आहे. कोरोनाला हरविण्यासाठी आपण सर्वांनी एकच निर्धार करायचा आहे तो म्हणजे लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करणे .
म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे अवाहन आहे की आपण आवश्यक काम असेल, तरच घरा बाहेर पडावे, कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने – आरोग्य विभागाने ज्या सूचना दिल्यात त्याचे पालन करणे . आप आपसात सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी आणि कोरोनाला हरविण्यासाठी आपण घराबाहेर पडू नये असे अवाहन पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना केले आहेत.