
यापुढे एकही रुग्ण दगावणार नाही याची सर्वप्रथम काळजी घेऊ: अधिष्ठाता डॉ. रामानंद
जळगाव (तेज समाचार प्रतिनिधी ):
जळगावाचा मृत्यूदर वाढलेला आहे़ मात्र, आता एकही रुग्ण दगावणार नाही, मृत्यूदर कमी करण्याला आमच्या टीमचे प्राधान्य राहील, अशी भावना नूतन अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी शनिवारी व्यक्त केली.
अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांचे निलंबन झाल्यानंतर तिसर्या दिवशी डॉ़ रामानंद यांनी शनिवारी दुपारी २ वाजता पदभार स्वीकारला. सुरूवातीला त्यांनी तत्कालीन अधिष्ठाता, प्रशासक डॉ. बी.एन. पाटील यांच्यासह काही डॉक्टरांसोबत आढावा बैठक घेऊन सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी निधीची कसलीच कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकार्यांनी दिल्याची माहिती डॉ़ रामानंद यांनी दिली. सायंकाळी डॉ.रामानंद यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी त्यांनी कोरोनाबाबत उपचार, निदान सर्वांत महत्त्वाचे असून त्यादृष्टिने सर्व नियोजन करणार आहे़ आपल्यासोबत रुजू होणार्या १६ डॉक्टर्सपैकी एक एक रूजू होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
धुळ्यातून कार्यमुक्त
रात्री तातडीने धुळ्यातून कार्यमुक्त झालो. सकाळी निघाल्यानंतर पारोळ्याजवळ अपघात झाल्यामुळे येथे वाहतूक ठप्प झाली होती़ मात्र, वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवून दुसर्या मार्गे वाहन आणल्याने लवकर येथे पोहचलो. अन्यथा सायंकाळपर्यंत उशीर झाला असता, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.