
छोटाहत्ती गाडीला आग शेतकऱ्यांचे शेती साहित्य जळून खाक
पारोळा – तालुक्यातील रत्नापिंप्री नजीक पारोळा अमळनेर रस्त्यावर शेतकऱ्यांचे शेती साहित्य घेऊन जाणारी छोटाहत्ती गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. यात शेतकऱ्यांचे पंच्यात्तर हजाराचे तर गाडी मालकाची गाडी जळून खाक झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पारोळा हुन भिलाली येथिल विलास श्रावण पाटील हे आपल्या गावातीलच बाळू रमेश पाटील यांच्या मालकीच्या छोटाहत्ती गाडी क्रमांक एम एच १८ ए ए २२३१ ह्या गाडीने दुपारी पारोळ्याहून ठिबक सिंचनासाठी लागणारे शेतीचे साहित्य पाईप , ठिबक नळ्या , सोल्युशन , इतर किरकोळ साहित्य असे एकुण पंच्यात्तर हजाराचे साहित्य घेऊन भिलाली कडे जात असताना तपोवन व रत्नापिंप्री गावच्या जवळच या गाडीला दुपारी दिड वाजता चालत्या गाडीला अचानक आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच चालक यांनी गाडी थांबवली व शेतकरी व स्वत गाडीतून बाहेर उतरत नाहीत तो पर्यंत गाडीने जास्तीचा पेट घेतला , आणि शेतकऱ्यांच्या शेती अवजारे , गाडी सुध्दा अग्नितांडवात जळून खाक झाली. यावेळी मयुर पाटील यांनी पारोळा अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. पारोळा अग्निशमन दलाचे सतिश चौधरी, मनोज पाटील यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु गाडी व ठिबक सिंचनासाठी चे सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
चालक जितेंद्र कोळी व विलास पाटील सुदैवाने बचावले. सदर घटनेची माहिती पारोळा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल, विजय भोई , राहुल पाटील, प्रमोद पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला यावेळी रत्नापिंप्री,भिलाली , दबापिंप्री , होळपिंप्री तरूणांनी मदत केली.