
शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव यांना अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी
शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव यांना अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी,
आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली दि. १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि ): शिरपूर तालुक्यात डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये झालेल्या नुकसानीची तसेच ऑगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी भाजप च्या वतीने जिल्हाधिकारी संजय यादव यांना आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दि. १० सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, बाजार समितीचे संचालक अविनाश पाटील, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, भाजपा शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी,
भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, प्रकाश भोमा गुजर, सरपंच साहेबराव पाटील, सरपंच अनिल गुजर आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी पाठपुरावा करून शेतकरी बांधव यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच मार्च २०२० मधील नुकसानीचा मोबदला देण्याबाबत प्रयत्न करणार. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे सांगितले.
आमदार काशीराम पावरा, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया व उपस्थित पदाधिकारी यांनी नुकसानीची माहिती देऊन लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
माहे डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये झालेल्या नुकसानीची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर झाल्याचे समजत असून नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गारपीट, वादळी वाऱ्यामुळे नुकसान ग्रस्त धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्याला आर्थिक निधी मिळावा. तसेच माहे ऑगस्ट २०२० मधील सतत पडणाऱ्या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन हे कडधान्य वर्गीय पिकांचे फुटवे फुटून नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त असंख्य शेतकरी बांधव यांना न्याय मिळावा व त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे १ सप्टेंबर २०२० रोजी सादर करण्यात आला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले होते. तसेच कीड रोगांमुळे मूग, उडीद, सोयाबीन इ. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी आयुक्तालय यांनी जिल्हा कृषी अधिकारी धुळे यांना दि. २६ ऑगस्ट २०२० च्या पत्र नुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिरपूर तालुक्यात मार्च २०२० मध्ये सुद्धा गारपीट, वादळी वारा व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. याबाबत पंचनामे करून तसा अहवाल माहिती तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या संयुक्तपणे केलेले पंचनामे, संपूर्ण अहवाल शासनास सादर केला असून धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात अतोनात नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पुरावे सादर केले होते. यावेळी दोन दिवस गारांचा खच रस्त्यावर पडलेला होता, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती, इलेक्ट्रिक तारा तुटून तीन दिवस वीज प्रवाह खंडित होता, शेतीमाल, शेड नेट आदि अनेक बाबींचे नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाले होते. याच कालावधीत झालेल्या नुकसान बाबत शासन आदेशानुसार नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गारपीट, वादळी वाऱ्यामुळे इतर जिल्ह्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र यात धुळे जिल्हा देखील समाविष्ट व्हावा. शिरपूर तालुक्यातील नुकसानीचे आकडेवारी, अहवालाच्या सत्यप्रती शासन दरबारी जमा झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनात शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध केला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकार ने देखील शेतकरी बांधव यांना मदत करावी असे यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले.